पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारीअर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस उजाडला, तरी अजूनही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, मनसेची उमेदवारी यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळे इच्छुकांना आता उमेदवारी यादीची प्रतीक्षा आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील युतीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. जागावाटपावरून युती फिसकटली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीविषयी चर्चा सुरू आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार आहे. युतीविषयी चर्चा होत असताना पालिकेतील एकूण १२८ जागांपैकी पहिल्या चर्चेत ८८ जागा, त्यानंतर ७५ जागांचा दावा भाजपाने केला होता. शिवसेनेने पहिल्यांदा फिफ्टी-फिफ्टी व त्यानंतर ५५-५८ चा फॉर्म्युला दिला होता. मात्र, भाजपा व शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमधील चर्चा पुढे सरकत नव्हती. शिवसेना पक्षप्रमुखांनी भाजपा शिवसेनेला सन्मानकारक वागणूक देत नाही, म्हणून युती न करण्याचा निर्णय घेत असल्याचे जाहीर केल्याने दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. (प्रतिनिधी)
युती फिसकटली; आघाडीची उत्सुकता!
By admin | Published: January 28, 2017 12:24 AM