रहाटणी : सध्या बंद बाटलीतील पाणी पिणे हे फ्याड झाल्याचे दिसून येत आहे़ एखादा व्यक्ती घरात नळाचे पाणी पिण्यासाठी वापरतो मात्र घराबाहेर पडले की पहिली पसंती ही बंद बाटलीतील पाण्यालाच दिली जात असल्याचे चित्र सध्यातरी सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे एका लिटर पाण्याच्या बाटलीची किंमत दिवसेंदिवस वाढतच आहे.या बाटली बंद पाण्यापेक्षा सध्या नारळाचे पाणी स्वस्त झाले आहे़ त्यामुळे शुद्ध पिण्याच्या पाण्याची बाटली विकत घेण्याच्या गरजेला व फॅशनला आता नारळ पाण्याने छेद दिला आहे. शहरात दररोज हजारो नारळपाण्याची विक्री होत असून, पिण्याच्या पाण्याची बाटली खरेदी करण्याऐवजी ग्राहक नारळपाणी घेण्यास पसंती देत आहेत.बाटलीबंद पाणी २० ते २५ रुपयांना विकले जात असताना नारळ पाणी मात्र अगदी १५ रुपयांपासून उपलब्ध झाल्याने नागरिकांचा कल त्याकडे वाढला आहे. सध्या शहरात रस्त्याच्या कडेला नारळाचे ढिगचेढिग दिसून येत आहेत़ २० रुपयाला एक, ५० रुपयाला तीन अशी नारळाची विक्री सुरू असल्याने नागरिकांचा कल थंड पाण्याच्या बाटलीपेक्षा नारळ पाण्याकडे वाढत आहे.राज्या बाहेरून नारळाची आवक मोठ्या प्रमाणात पिंपरी-चिंचवड शहरात होत आहे. दररोज सकाळी काळेवाडी परिसरात एक ते दोन ट्रक येतात. एका ट्रकमध्ये किमान आठ ते दहा हजार नारळ येत असतात व त्यासाठी वाहतूक खर्च तीस ते चाळीस हजार रुपये येत असल्याची माहिती ठोक विक्रेत्यांनी दिली. शहरातील अनेक भागात रस्त्याच्या कडेला दुकाने थाटून या नारळपाण्याची विक्री चालू आहे.तसेच काही हातगाड्यांवरही शहराच्या अंतर्गत भागात फिरून नारळपाण्याची विक्री केली जाते. फक्त पाण्याचे नारळ, पाणी व खोबºयाचा गर असलेले नारळ असे विविध प्रकारची नारळे विक्री होत आहेत. एक ते दोन ग्लास पाणी, मलई युक्त नारळ यातून मिळत असल्यामुळे नागरिक तहान भागविण्यासाठी नारळपाणी घेत आहेत.नारळ पाणी आरोग्यासाठी चांगले असते यामुळे शक्ती वाढते. तसेच उन्हात थंडावा मिळतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.रुग्णाला संजीवनी म्हणून व शारीरिक स्वास्थ्यासाठी नारळ पाण्यास पसंती दिली जाते. परंतु, आता टंचाईच्या काळात महागलेल्या बाटलीबंद पाण्याला पर्याय म्हणून लोक नारळपाण्याकडे पाहत आहेत. प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी, त्याची चव व त्याची गुणवत्ता याचे अनेक अनुभव गाठीशी असणारे ग्राहक शुद्धता, चव आणि नैसर्गिक शक्ती म्हणून नारळपाण्यास पसंती देत आहेत.
नारळ पाणी झाले स्वस्त..!, नागरिकांचा कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 1:30 AM