शशिकांत जाधव , तळवडेचिखली-तळवडे परिसरात नोव्हेंबर महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात तीन जणांना प्राण गमवावे लागले. अपघात होऊनही ते कशामुळे झाले, ते रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत प्रशासनाने हालचाल केली नाही. प्रशासनाला आणखी किती बळींची प्रतीक्षा आहे, असा सवाल परिसरातून विचारला जात आहे. यामध्ये सोनवणेवस्ती, चिखली येथे दुचाकी व ट्रक यांची समोरासमोर टक्कर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार नीलेश वरगट या युवकाला प्राण गमवावा लागला. तळवडे येथे झालेल्या अपघातामध्ये दीपक चव्हाण यांचा बळी गेला, चिखली जाधववाडी येथे स्पाइन रोड परिसरात पायी रस्ता ओलांडणाऱ्या महापालिका कर्मचारी रोहिदास पठारे यांना धावत्या वाहनाने ठोकरल्याने मृत्यू झाला. हे तीनही अपघात एवढे भीषण होते की, अपघातग्रस्त व्यक्तींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. बेशिस्त वाहन चालवणे, रस्त्यावर सूचना फलक नसणे, गतिरोधक नसणे यासारखी कारणे यामागे आहेत. पण त्या समस्या सोडविण्यासाठी कोणीच प्रयत्न केले नाहीत.देहू-आळंदी रस्त्याचे काम कासवगतीने सुरू आहे. तळवडे गावातून सॉफ्टवेअर पार्क, तसेच चाकण एम.आय.डी.सी.परिसरात होणारी प्रचंड वाहतूक लक्षात घेऊन तळवडे चौक ते कॅनबे चौक या मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जावे, अशी मागणी ‘फ’ प्रभाग समिती स्वीकृत सदस्य प्रवीण भालेकर यांनी केली आहे.शहरातील अनेक ठिकाणी केवळ प्रशासकीय चुकीमुळेच अपघाताच्या घटना घडत आहेत. पण तेथे कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. या प्रकरणी सामाजिक संस्थाही शांत असून, प्रशासकीय यंत्रणेला जाग आणण्यासाठी आंदोलनाचे शस्त्र उगारले जात नाही. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा थंडच पडते. निगडी, प्राधिकरणातही अनेक रस्त्यावर वाहतुकीचे नियम मोडले जातात. परंतु, नियम मोडणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. नियम मोडणाऱ्यांनाच पाठिशी घातल्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. या घटना रोखणे गरजेचे आहे.
थंड प्रशासन, वाढले अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2015 12:49 AM