पिंपरी : महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तळेगाव दाभाडे येथील स्वराज नगरीमध्ये शुक्रवारी (दि. १४ मार्च) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
अंकिता संजय पाटील (१९, सध्या रा. स्वराज नगरी, तळेगाव दाभाडे. मूळ रा. येसलेवाडी, आरळा, जि. सांगली), असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता पाटील ही शिक्षणासाठी तळेगाव दाभाडे येथे आली होती. दोन मैत्रिणींसह ती भाडेतत्त्वावरील सदनिकेत वास्तव्यास होती. तिच्या दोन्ही मैत्रिणी सणानिमित्त गावी गेल्या होत्या. दरम्यान अंकिता हिने राहत्या घरातील छताच्या पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला. याबाबत माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अंकिता हिला तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी पोलिसांना सांगितले. वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज चौधरी यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
मोबाइल पोलिसांच्या ताब्यात
अंकिता राहत असलेल्या घरात पोलिसांनी पाहणी केली. सुसाइड नोट किंवा इतर संशयास्पद काही आढळून आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अंकिता हिचा मोबाइल फोन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. आत्महत्येचे नेमके कारण काय, याबाबत पोलिस तपास करीत आहेत.