वडगाव मावळ : वर्षानुवर्षे दुर्गम भागांत काम करणाऱ्या शिक्षकांना अवघड क्षेत्रातील ठरवून त्यांच्या बदलीस प्राधान्य देणारा नवा आदेश फेब्रुवारी महिन्यात शासनाने काढला आहे. या आदेशामुळे डोंगराळ भागात गेली अनेक वर्षे कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना सोयीच्या ठिकाणी बदली मिळणार आहे.बदलीविषयक या आदेशामुळे एक प्रकारे न्याय मिळणार आहे, अशी चर्चा सर्वसामान्य शिक्षकांमध्ये होत आहे. या बदल्या थेट आॅनलाइन होणार असल्यामुळे शिक्षकांना आता शिक्षक संघटनेच्या व पुढाऱ्यांच्या पुढे पुढे करण्याची गरज राहिली नाही. पण, संघटना व नेते आपले महत्त्व कमी होऊ नये व आपल्याला दूरच्या शाळा मिळू नयेत म्हणून अशा प्रकारे शिक्षकांना वेठीस धरत आहेत.नव्या बदली धोरणामुळे वर्षानुवर्षे वाशिल्यावर सोयीच्या ठिकाणी घराजवळच्या शाळेत काम करणारे शिक्षक नेत्याची धांदल उडाली आहे. शाळेकडे कमी फिरकणारे व नेतेगिरी करत हिंडणारे शिक्षक नेत्यांना या नव्या धोरणामुळे अवघड क्षेत्रात जाऊन काम करावे लागणार आहे. त्यामुळे या शिक्षक नेत्यांनी, या नव्या बदली धोरणाला विरोध दर्शविला असून, नेहमीप्रमाणे मोर्चाचे अस्त्र उगरले आहे. संघटनांच्या या मोर्चात सामील होऊन सामान्य शिक्षक आपल्याच पायावर दगड मारून घेणार का? असे काही शिक्षक खासगीत बोलत आहेत. दुसरीकडे याच शिक्षक संघटना शिक्षकांच्या जुनी पेंशन सारख्या मुद्द्यावर महाराष्ट्रभर अशा एकत्र येऊन मोर्चाचे अस्त्र का उपसत नाहीत? असा प्रश्न शिक्षकांमधून विचारला जात आहे. या नव्या बदली धोरणाला विरोध म्हणजे शिक्षक नेत्यांची स्वार्थीवृत्ती आहे. ज्या अवघड क्षेत्रात जायला यांना नको वाटते तिथे आज कोणी तरी शिक्षक बंधू भगिनी काम करत आहेतच ना? मग त्यांनी तेथेच आणखी किती वर्षे काम करायचे? त्यांच्या अडचणी या नेत्यांना दिसत नाहीत का? फक्त बदल्यांच्या आणि संघटना अधिवेशनाच्या मुद्द्यावर आक्रमक होणाऱ्या या संघटनांनी शिक्षक हिताच्या इतर ही बाबींचा विचार करावा, अशी अपेक्षा शिक्षकांतून व्यक्त होत आहे.शिक्षण खात्यातील अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी संघटनामधील पदांचा गैरफायदा घेणाऱ्या शिक्षक नेत्यांना चाप लावावा. इतर शिक्षकांवर सातत्याने होणारा अन्याय दूर करावा, अशी मागणी अनेक शिक्षक करत आहेत. (वार्ताहर)
‘त्या’ शिक्षकांना दिलासा
By admin | Published: April 25, 2017 4:05 AM