- ज्ञानेश्वर भंडारे
पिंपरी : महापालिकेच्या कारभारावर आयुक्तांचा अंकुश नसल्याचा आरोप होत आहे. विविध विभागांचे प्रमुख तसेच अधिकारी काम करत नसल्याच्या तक्रारी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. शहरातील एक आमदार आणि खासदारांचेच ऐकून आयुक्त काम करत असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे आयुक्तांची पालकमंत्री ‘दादां’नी मुंबईला बोलावून कानउघाडणी केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत मार्च २०२२ मध्ये प्रशासकीय राजवट सुरू झाली. त्यावेळी महाविकास आघाडीची सत्ता होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्ताकाळात प्रशासक तथा आयुक्तपदी शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी शहरातील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी सुचवलेली विकासकामे आणि प्रकल्पांना प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत होता. मात्र, दरम्यान, जुलैमध्ये राष्ट्रवादीतील अजित पवार यांचा गट महायुतीमध्ये सहभागी झाला आणि पवार उपमुख्यमंत्री झाले. काही दिवसांनंतर पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची सूत्रे आली. परिणामी महापालिकेत पवार विरुद्ध भाजप-शिवसेनेचे स्थानिक नेते असा सुप्त संघर्ष निर्माण झाला. या राजकीय अस्थिरतेचा फायदा प्रशासनाने घेण्यास सुरूवात केली. त्यामुळे अधिकारीही ‘हम करे सो कायदा’ अशा भूमिकेत आहेत. त्यात आयुक्तांचा अंकुश नसल्याने अधिकारीही कोणाचे ऐकत नसल्याचे चित्र आहे.
अधिकारी कोणाच्या कानाला लागतात?
महापालिका आयुक्त शेखर सिंह रूजू झाल्यानंतर काही महिन्यांतच त्यांची बदली होणार असल्याची चर्चा होती. मात्र, आयुक्तांनी सत्तेतील दोन्ही दादांशी जुळवून घेतल्याने बदली थांबल्याचे बोलले जाते. महापालिकेतील अधिकारी आयुक्तांनी काम सांगितले की, आमदार आणि खासदारांच्या घरी जाऊन आयुक्तांच्या तक्रारी करतात. काहींनी तर झालेल्या बदल्याही रद्द करून घेतल्या आहेत. त्यामुळे आयुक्तांचाही नाईलाज होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.