पिंपरी : राज्यातील सत्ता बदल होताच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त, प्रशासक राजेश पाटील यांची मंगळवारी तडकाफडकी बदली झाली आहे. त्यांच्या जागी शेखर सिंह यांची नियुक्ती झाली आहे. महापालिका प्रशासनास शिस्त लावणारे, चुकीच्या कामाना ब्रेक लावण्याचे काम त्यांनी सव्वा वर्षात केले आहे.
ओडिशा केडरचे २००५ च्या बॅचचे आयएएस राजेश पाटील यांची आंतरराज्य प्रतिनियुक्तीने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी १५ फेब्रुवारी २०२१ रोजी नियुक्ती झाली. पाटील प्रतिनियुक्तीने ५ वर्षासाठी महाराष्ट्रात आले आहेत. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात पिंपरी चिंचवड शहरात पाटील यांची नियुक्ती झाली होती.
महापालिकेत दाखल झाल्यानंतर आयुक्त पाटील यांनी प्रशासकीय शिस्त लावली, तसेच प्रशासकीय गतिमानता आणि स्वच्छ भारत अभियानात खूप चांगले काम केले आहे. महापालिकेच्या प्रशासकीय कालखंडात त्यांनी जनसंवाद उपक्रमातून सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फाडली होती. मात्र, सुरुवातीपासून तत्कालीन सत्ताधारी भाजपशी जुळले नाही. त्यामूळे भाजपने त्यांच्यावर आरोप केले होते. सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदी बदली झाली आहे. पूर्वी ते गडचिरोली येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. शेखर सिंह हे २०१६ च्या बॅचचे अधिकारी असून देश पातळीवर त्यांनी ३०६ वा क्रमांक पटकावला होता.