पिंपरी : विविध राजकीय पक्षांकडून होणारी फ्लेक्सबाजीला आवर घाला, शहराचे विद्रूपीकरण रोखा, अशी मागणी गुरूवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत पदाधिकाऱ्यांनी केला होता. तीन दिवसात फ्लेक्स काढण्याचे आदेश आयुक्त दिनेश वाघमारे यांनी प्रशासनास दिले होते. मात्र, चार दिवस उलटूनही शहरातील विविध भागातील फलक तसेच आहेत. आयुक्तांच्या आदेशाला अधिकाऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहे.महापालिका स्थायी समिती सभेत अनधिकृत फ्लेक्सबाजीचा प्रश्न गाजला होता. याबाबत सर्वसाधारण सभेतही अनधिकृत फ्लेक्सबाजीचा प्रश्न गाजला होता. मात्र, प्रशासनाकडून याबाबत गांभीर्याने दखल घेतली जात नाही, अशी पदाधिकाऱ्यांची तक्रार आहे. विनापरवाना फ्लेक्समुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असोत, विनापरवाना फ्लेक्सवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी नारायण बहिरवाडे, संदीप चिंचवडे यांनी केली होती. त्यानंतर आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले होते. तीन दिवसांत कारवाई केली जाईल, असे आदेश देऊनही आठवडा झाला, तरी शहरातील प्रमुख चौकातील फ्लेक्स जसेच्या तसेच आहेत. कारवाईबाबत टाळाटाळ होत असल्याची तक्रार पदाधिकारी करीत आहेत. (प्रतिनिधी)
आयुक्त आदेशाला वाटाण्याच्या अक्षता
By admin | Published: December 22, 2016 2:14 AM