पिंपरी : नगरसेवकाच्या कार्यालयात जाऊन पाणी येत नसल्याची तक्रार केल्याच्या कारणावरून टोळक्याने एका कुटुंबातील तीन सदस्यांना बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास पिंपळे निलख, पंचशीलनगर येथील धीरज गोल्डे अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये घडली.
अमोल कामटे, विशाल कामटे, प्रतीक दळवी, गणेश व इतर पाच जणांवर (सर्व रा. पिंपळे निलख) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष लक्ष्मण दोडके (वय ४३, रा. धीरज गोल्डे अपार्टमेंट, दुसरा मजला, पंचशीलनगर, पिंपळे निलख) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दोडके व आरोपी हे एकाच परिसरात राहतात. पाणी येत नसल्याबाबत नगरसेवक तुषार कामटे यांच्या कार्यालयात दोडके यांनी गुरुवारी तक्रार केली.
दोडके हे पाणी येत नसल्याची नगरसेवकांकडे सतत तक्रार करण्याच्या कारणावरून अमोल कामटे, विशाल कामटे, प्रतीक दळवी, गणेश व इतर पाच जणांनी मारहाण केली. यामध्ये त्यांच्या चेहºयास व कमरेस दुखापत झाली. तसेच दोडके यांचा मुलगा प्रणिकेत यास विशाल कामटे याने लाकडी दांडक्याने मारल्याने त्यालाही दुखापत झाली. तसेच त्यास जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच दोडके यांची पत्नी सारिका यांनाही मारहाण केली.