पिंपरी : छेड काढणारे, तसेच टवाळखोर यांच्याकडून त्रास होत असल्यास विद्यार्थिनींनी त्यांची तक्रार महाविद्यालयात लावलेल्या तक्रार पेटीत टाकावी, त्या तक्रारीची दखल घेऊन उपाययोजना केल्या जातील, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मात्र, अनेक महाविद्यालये तक्रार पेट्या लावत नाहीत, पेट्या ठेवल्यातरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे विद्यार्थिनींसाठी ठेवलेल्या तक्रार पेट्या कुचकामी ठरत आहेत.शहरात विविध ठिकाणी, तसेच महाविद्यालयांजवळ टवाळखोरांकडून विद्यार्र्थिनींची छेडछाड करण्याचे प्रकार वाढले आहेत. छेडछाडीच्या घटनांबद्दल नागरिक तक्रार करतात. मुली असुरक्षित असल्याबद्दल पालक असुरक्षितता व्यक्त करतात. महाविद्यालयात लावलेल्या तक्रार पेट्यांमधून मात्र विद्यार्र्थिनींच्या तक्रारी का दिसून येत नाहीत, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. तक्रारदार विद्यार्र्थिनीने नाव न लिहिता तक्रार नोंदवली, तरी त्याची दखल घेतली जाते. विद्यार्र्थिनीचे नाव गोपनीय ठेवले जाते. असे असतानाही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून मुलींची छेडछाड होत नसावी वा टवाळखोर, छेडछाड करणारी टोळकी बाहेरची असावीत, असा एक मुद्दा पुढे आला आहे. महाविद्यालयात शिक्षण न घेणारे बाहेरचे तरुण महाविद्यालयाच्या आवारात अथवा महाविद्यालयाजवळ टवाळखोरी करतात. अशा टवाळखोरांबद्दल तक्रार देण्यास विद्यार्र्थिनी धजावत नाहीत.सुरक्षिततेसाठी आयुक्तांचा पुढाकारपुणे शहर पोलिसांनी महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे. पोलीस काका, बडी कॉप, प्रतिसाद अॅप या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, संकटाच्या वेळी महिला अथवा मुलींना त्याचा उपयोग होतो. पोलिसांकडून तातडीची मदत मिळविणे शक्य होते. परंतु, लोकमतने केलेल्या पाहणीत अनेक महाविद्यालयांच्या विद्यार्थिंनीना हेल्पलाईनविषयी माहितीच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हेल्पलाईन उपलब्ध असूनही त्याचा उपयोग होताना दिसत नाही.महिला सुरक्षा जनजागृती अभियानांतर्गत याबाबतची माहिती महिलांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे. सहा महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी हिंजवडीत ‘वॉक विथ कमिशनर’ असा उपक्रम राबविला. आयटी क्षेत्रात काम करणाºया तरुणींची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नोकरीच्या ठिकाणी काही त्रास असल्यास थेट पोलिसांना कळवावे. कठोर कारवाईच्या उपाययोजना राबवून नोकरदार महिला, तसेच महाविद्यालयीन तरुणींना संरक्षण दिले जाईल, अशी ग्वाही पोलीस आयुक्त शुक्ला यांनी दिली होती. त्यानंतर हिंजवडी, वाकड पोलीस ठाण्यात काही नोकरदार तरुणींनी तक्रारी दिल्या होत्या. त्याचप्रमाणे शहरातील महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांनीच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
तक्रारपेट्या कुचकामी; महाविद्यालयांचा निरुत्साह, विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या घटनांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 4:32 AM