पिंपरी : राज्यात अजूनही विजेच्या समस्या कमी होत नसल्याने आणि ग्राहकांच्या समस्या वेळेवर सोडविल्या जात नसल्याने वीज कंपनीने पुढाकार घेत विद्युत लोकपाल या पदाची स्थापना केली आहे. तक्रार निवारण कक्ष (आयजीआरसी), ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच (सीजीआरएफ) यांच्याकडे ग्राहकाच्या समस्येचे निराकरण न झाल्यास आता ग्राहक थेट विद्युत लोकपालकडे धाव घेऊ शकणार आहे. तेथे ६० दिवसांत ग्राहकास न्याय मिळणार आहे.विद्युत लोकपालच्या कार्यालयाची स्थापना मुंबई येथे झाली असून, त्याची कार्यकक्षा १५ जिह्यांसाठी आहे. मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्याचे काम मुंबई विद्युत लोकपाल पाहणार आहेत, तर उर्वरित सर्व जिल्ह्यांंचे काम नागपूर विद्युत लोकपाल पाहणार आहे, अशी माहिती मुंबई विभागाचे विद्युत लोकपाल आर. डी. संख्ये यांनी दिली. महावितरणचे मुख्य अभियंता नीलकंठ वाडेकर, जिल्हा वीज ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष शहाजी शेळके आदी या वेळी उपस्थित होते. संख्ये म्हणाले, तक्रारदाराने प्रथम आयजीआरसी यांच्याकडे तक्रार दाखल करावी. तेथे दोन महिन्यांत कोणतीही कारवाई झाली नाही, तर सीजीआरएफमध्ये तक्रार नोंदवावी. तिथेही तक्रारदाराचे समाधान न झाल्यास ६० दिवसांच्या आत ग्राहकाने विद्युत लोकपालकडे तक्रार नोंदविणे गरजेचे आहे. त्यानंतर ६० दिवसांच्या आत लोकपाल तक्रारदाराच्या तक्रारीचे निवारण करेल. विद्युत लोकपालकडे तक्रार दाखल करताना अर्जासोबत सीजीआरएफच्या आदेशाची प्रत असणे बंधनकारक आहे. तसेच तक्रार दाखल करताना कोणत्याही प्रकारची रक्कम अथवा शुल्क आकारण्यात येत नाही. विद्युत लोकपालसमोर सुनावणीदरम्यान ग्राहकाला तसेच कंपनीला वकील नेमता येणार नाही. ग्राहकाला आपली बाजू स्वत: किंवा प्रतिनिधीद्वारे मांडता येऊ शकणार आहे. (प्रतिनिधी) अडीच कोटींच्या ग्राहकांमधून केवळ २ हजार तक्रारीराज्यात २ कोटी ६५ लाख वीज ग्राहक आहेत. मात्र गतवर्षात फक्त २००० तक्रारी ग्राहकांनी दाखल केल्या. याचा अर्थ वीज ग्राहकांमध्ये जनजागृतीची कमी आहे. विजेसंदर्भातील तक्रारी ग्राहकांनी नोंदवायला हव्यात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे गरजेचे आहे, असे आर. डी. संख्ये यांनी सांगितले.
ग्राहक करू शकणार लोकपालकडे तक्रार
By admin | Published: June 08, 2015 5:31 AM