पिंपरी :मावळ लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी अर्ज भरताना १०० मीटर नियमाचे उल्लंघन केले. महायुतीच्या १६ नेत्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्याची दखल निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी घेतली आहे. पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
मावळ लोकसभेचा आखाडा आता रंग भरू लागला आहे. महायुतीने आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार भापकर यांनी आयोगाकडे केली होती. त्यावर दीपक सिंगला यांनी पोलिसांना पत्र दिले आहे.
काय आहे भापकर यांची तक्रार
निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू आहे. दिनांक २२ एप्रिलला अर्ज दाखल करीत असताना निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात उमेदवारासहित एकूण पाच व्यक्तींनाच प्रवेश असतो, जास्त व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही, असा नियम होता. बारणे यांनी दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत अर्ज दाखल केले. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर, आमदार प्रवीण दरेकर, प्रशांत ठाकूर, अण्णा बनसोडे, सुनील शेळके, अश्विनी जगताप, उमा खापरे, अमर साबळे, बाळा भेगडे, महेश मालदी आदि १६ महायुतीचे नेते उपस्थित होते. बारणे यांनी चार नामनिर्देशन पत्र भरले. मात्र, हे चार नामनिर्देशन पत्र देताना चार, चार नेत्यांना त्यांच्यासमवेत घेऊन काही मिनिटांच्या अंतराने दाखल केले. हे नामनिर्देशन पत्र दाखल करताना एकच दिवशी, एकाच तारखेला काही मिनिटाच्या अंतराने आपल्यासमोर दाखल केले.
उमेदवाराने चार प्रतिनिधींच्या समवेत एकाच वेळी चार नामनिर्देश दाखल करणे अभिप्रेत होते. मात्र, तसे न करता बारणे यांनी पळवाट शोधली. आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. तसेच नेते व कार्यकर्ते आपल्या कार्यालयासमोर येऊन त्यांनी १०० मीटरच्या सीमारेषा ओलांडली. घोषणाबाजी केली. बारणे व त्यांच्या समवेत १६ नेत्यांना, कार्यकर्त्यांना पोलिसांनी १०० मीटरच्या आत प्रवेश दिलाच कसा असा सवाल करीत कारवाईची मागणी केली.