स्वानंद सुखनिवासी सद्गुरू विष्णू नरहरी जोगमहाराज यांनी संस्थापित केलेल्या श्रीक्षेत्र आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेला शंभर वर्षे पूर्ण होत असून बुधवारपासून (दि. २२) शताब्दी पूर्ती सोहळा सुरु होत आहे. या संस्थेतून वारकरी संतवाङ्मय व संतांच्या शुद्ध आचारविचारांचा समाजात प्रसार करणारे शुद्ध सदाचारसंपन्न वारकरी कीर्तनकार, विद्वान, प्रवचनकार, सांप्रदायिक भजन गायक, प्रशिक्षित वादक तयार करण्यात येत आहेत. संस्थेच्या शताब्दी पूर्ती महोत्सवानिमित्त संस्थेचे अध्यक्ष हभप संदीपानमहाराज पाटील हासेगावकर यांच्याशी केलेली बातचीत.
वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी सोहळ्याची तयारी कधीपासून सुरु झाली आहे ? स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोगमहाराज यांनी संस्थापित केलेल्या वारकरी शिक्षण संस्थेला गुढीपाडव्याला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने शताब्दी पूर्ती सोहळा बुधवारी (दि.२२) सुरु होत आहे . गेल्या वर्षभरात शताब्दी वर्षाचे औचित्य साधून राज्याच्या कानाकोपऱ्यातील विविध गावांत अडीचशेहून अधिक अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. गेले वर्षभर मुख्य सोहळ्याची प्राथमिक तयारी सुरूझाली आहे. शताब्दी सोहळ्याच्या तयारीबाबत काय माहिती द्याल ? बुधवारपासून सुरु होणाऱ्या शताब्दी पूर्ती सोहळ्यांतर्गत अखंड हरिनाम सप्ताहात सुमारे एक लाख वारकरी सहभागी होण्याचा अंदाज असून, संस्थेच्या परिसरात एकूण तीन भव्य मंडप उभारण्यात आले आहेत. सहा ठिकाणी एलईडी स्क्रीन बसविण्यात येत आहे. राज्यातून येणाऱ्या वारकरी, भाविक यांची आळंदीतील विविध ७० धर्मशाळांतून राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या विविध संप्रदायातील साधू-महात्म्यांची व्यवस्था संस्थेच्या परिसरात करण्यात आली आहे. सोहळ्याला राज्यातील विविध संस्थान व परंपरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दैनंदिन कार्यक्रमांचे नियोजन कसे करण्यात आले आहे? सोहळ्यात पहाटे काकडआरती, सकाळी पारायण, गाथा भजन व वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहे. दुपारच्या सत्रात श्रीरामकथा होणार असून, त्यानंतर हरिद्वार, इंदोर , ऋषिकेश , हरियाणा , श्रीधाम वृंदावन, वेरूळ, आळंदी व त्र्यंबकेश्वर येथील साधू-महात्म्यांचे प्रवचन होणार आहे. सायंकाळी ज्ञानेश्वरीवर आधारित प्रवचन होणार असून, त्यानंतर हरिकीर्तन होणार आहे. रात्री वारकरी संगीत भजन होणार आहे. शताब्दी विशेष समारंभाबाबत माहिती? शताब्दी महोत्सव विशेष कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे असतील. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट आदी उपस्थित राहणार आहेत. या वेळी वारकरी शिक्षण संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे . सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्यसेवेबाबत कोणती व्यवस्था करण्यात आली आहे? सहभागी वारकऱ्यांच्या आरोग्याबाबत इंद्रायणी हॉस्पिटल, वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट , श्री गोपालकृष्ण गोसेवा केंद्र , विश्वमाऊली आयुर्वेदिक चिकित्सालय यांच्याकडून सहकार्य मिळणार आहे . तसेच चोपदार फाउंडेशनकडून स्वच्छतेसाठी परिसरात योग्य ती व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शब्दांकन : देवराम भेगडे