पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे शनिवारी भूमिपूजन होत असून, या समारंभासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. तब्बल ५० हजार नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी तयारीची पाहणी केली. खासदार संजय काकडे, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव, भाजपा शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते. कृषी महाविद्यालयाच्या सिंचननगर येथील पटांगणात हा समारंभ होणार असून, नागरिकांना बसण्यासाठी ३५ हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मागच्या बाजूस भारतीय बैठकीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सहा मोठे स्क्रीन्स लावण्यात आले असून, बाहेरच्या बाजूसही ४ स्क्रीन्स लावण्यात आले आहेत. तीन किलोमीटरपर्यंत आवाज ऐकू जाईल, असे ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत. आठ ते दहा हजार वाहनांसाठी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी मुंबईतील कार्यक्रमानंतर ६.३५ पर्यंत येथे येणार असून, ६.४० ला कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. कार्यक्रमानंतर ८ वाजता मोदी दिल्लीकडे रवाना होणार आहेत, अशी माहिती बापट यांनी या वेळी दिली.बापट म्हणाले, ‘‘गेली १० वर्षे रखडलेल्या मेट्रो प्रकल्पास भारतीय जनता पक्षाच्या सरकारने खऱ्या अर्थाने गती दिली. त्यामुळेच केवळ २ वर्षांत केंद्र व राज्य सरकारची या प्रकल्पास मान्यता प्राप्त झाली. आता मेट्रोचे काम प्रत्यक्षातही सुरू झाले आहे.’’ (प्रतिनिधी)पंतप्रधानांच्या स्वागतासाठी रस्ते चकाचकपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी सार्वजनिक भिंती, दुभाजके व रस्ते चकाचक झाले आहेत. विमानतळावरून मोदी येणार असलेल्या मार्गावरील नवीन होळकर पुलाचे दुभाजक विविध चित्रांनी रंगवण्यात आले आहेत. स्वच्छ भारत अभियानाचे संदेश या भिंतींवर रेखाटण्यात आले आहेत. रस्त्यांचीही दुुरुस्ती करण्यात आली आहे. पादचारी मार्गाची डागडुजीही या निमित्ताने करण्यात येत आहे. खडकी कॅन्टोन्मेंटच्याच हद्दीत असलेल्या वॉर सिमेंटरीसमोरील रस्त्यावर कित्येक महिन्यांपासून मोठमोठे खड्डे होते. पंतप्रधान या मार्गाने येणार असल्याने हे खड्डे बुजविण्यात आले आहेत.
मेट्रोच्या भूमिपूजनाची तयारी पूर्ण
By admin | Published: December 24, 2016 12:58 AM