कामशेत : टाकवे वडेश्वर गटात राष्ट्रवादीच्या उमेदवार शोभा कदम यांनी बाजी मारली असून, अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार आशाबाई जाधव यांना त्यांनी फक्त २६८ मतांनी पराभूत केले. निवडणूक निकालाच्या ठिकाणी काही काळ भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.गटात निकालाच्या सुरुवातीपासून राष्ट्रवादीच्या कदम व भाजपाच्या जाधव यांच्यात चुरशीची लढत सुरू होती. दोन्हीही उमेदवार कमी-जास्त फरकाने एकमेकांच्या पुढे-मागे होत होते. तशी बाहेर थांबलेल्या कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. निकालाच्या शेवटच्या फेऱ्यांमध्ये शोभा कदम यांनी आघाडी घेऊन जाधव यांचा पराभव केला.पंचायत समितीच्या टाकवे बुद्रुक गणातून भाजपाचे उमेदवार शांताराम कदम यांनी राष्ट्रवादीच्या शिवाजी असवले यांचा ४८९ मतांनी पराभव करून विजय संपादन केला. वडेश्वर गणात सुरुवातीपासून आघाडीवर असलेल्या भाजपाचे उमेदवार गणपत सावंत शेवटच्या फेऱ्यामध्ये माघारी पडल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय शेवाळे फक्त ७४ मतांनी विजयी झाले. काही मतांनी भाजपाचे सावंत यांना पराजय पत्करावा लागल्याने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती.जिल्हा परिषदेपेक्षा अनेकांचे पंचायत समितीच्या टाकवे व वडेश्वर गणाकडे लक्ष लागले होते. यातही वडेश्वर गणातून बाळासाहेब नेवाळे यांचा भाचा दत्तात्रय शेवाळे यांना राष्ट्रवादी पक्षाने तिकीट दिल्याने अनेक कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा परिसरात सुरू होती. शिवाय त्यांच्या विरोधात भाजपाचे गणपत सावंत यांना उमेदवारी मिळाल्याने ही लढत मोठी चुरशीची होणार हे पक्के असताना तसेच सुरुवातीपासून भाजपाचे गणपत सावंत सुरुवातीपासून आघाडीवर असल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण ऐन वेळी शेवटच्या मतमोजणी फेऱ्यांत दत्तात्रय शेवाळे यांनी मुसंडी मारून भाजपाचे गणपत सावंत यांचा ७४ मतांनी पराजय केला. (वार्ताहर)दत्तात्रय शेवाळे यांच्या विजयात टपाल मते निर्णायक वडेश्वर गणाचा निकाल जाहीर होताच भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला, तर राष्ट्रवादी पक्षासाठी तसेच बाळासाहेब नेवाळे यांच्या प्रतिष्ठेची समजली जाणारी या गणातील निवडणूक राष्ट्रवादीचे तरुण उमेदवार दत्तात्रय शेवाळे यांनी अतितटीने शेवटच्या फेरीत तसेच टपाल मताच्या साह्याने जिंकली.शोभा कदम, शांताराम कदम विजयीटाकवे वडेश्वर जिल्हा परिषद गट : १) शोभा सुदाम कदम , राष्ट्रवादी (११५६६ विजयी ) २) आशाबाई पंडित जाधव, भाजपा - (११२९८)टाकवे बुद्रुक पंचायत समिती गण : १) शांताराम सीताराम कदम,भाजपा (५३०८ विजयी), २) शिवाजी चिंधू असवले, राष्ट्रवादी (४८१९), वडेश्वर पंचायत समिती गण : १) दत्तात्रय नाथा शेवाळे, राष्ट्रवादी (५१८२,विजयी) २) गणपत बाबुराव सावंत,भाजपा (५१०८)
टाकवे वडेश्वरला संमिश्र निकाल
By admin | Published: February 24, 2017 2:42 AM