पिंपरी : एकतर्फी प्रेमातून संगणक अभियंत्याने तरुणीचा विनयभंग केला. ही घटना हिंजवडीत घडली. याप्रकरणी संबंधित तरुणीने पोलिसात फिर्याद दिली आहे. पिनाक नेपाल मुजुमदार (वय ३०) असे विनयभंग करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तो हिंजवडी येथील एका कंपनीत काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिनाक नेपाल मुजुमदार आणि संबंधित तरुणी हे ओळखीचे असून दोघांची मैत्री आहे. २०१२ ला दोघेही चेन्नई येथे एकत्र नोकरी करत होते. परंतु,२०१७ ला मुजुमदार हा हिंजवडी येथील कंपनीत संगणक अभियंता म्हणून कार्यरत झाला.
दोघांचे फोन आणि मेसेजद्वारे केवळ मित्र या नात्याने बोलणे सुरू होते. मध्यंतरी आरोपी मुजुमदारचा वाढदिवस झाला तेव्हा देखील तरुणी हिंजवडी येथे आली होती. मात्र,डिसेंबर महिन्यात चेन्नई येथून तरुणीला मुजुमदारने हिंजवडीत बोलावून घेतले ‘तुझ्यावर खूप प्रेम करतो, तू काहीच उत्तर देत नाहीस’ असं म्हणून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तरुणी घाबरलेल्या अवस्थेत त्याच रात्री चेन्नईला निघून गेली. दरम्यान,रविवारी या प्रकरणी तरुणीने हिंजवडी येथे येऊन फिर्याद दिली आहे. अद्याप आरोपी हा फरार आहे. घटनेचा अधिक पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर या करत आहेत.