पिंपरी : मतदानाची शाई पुसण्याचे रसायन घेऊन आलेल्या सहा कार्यकर्त्यांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे एकाच वेळी जिल्हा परिषद, महापालिकेचे मतदान होत असल्याने जवळच्या ग्रामीण भागात मतदान करून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मतदानात सहभागी होण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न फसला. पोलिसांनी तातडीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडील शाई पुसण्याचे रसायन अन्य साहित्य जप्त केले. महापालिका हद्दीत वाकड परिसर आहे. परंतु या परिसराला लागूनच हिंजवडी,माण, मारुंजी हा ग्रामीण परिसर आहे. सकाळी माण, मारुंजी, हिंजवडी भागातील मतदान केंद्रावर मतदान करून दुसऱ्यांदा महापालिकेच्या प्रभागात मतदान करण्यासाठी तरुणांची टोळकी वाकडमध्ये दाखल झाली. जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत बोटाला लावलेली शाई त्यांनी विशिष्ट रसायन लावून पुसून काढली. काहींच्या बोटांची शाई काढण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. (प्रतिनिधी)पैसेवाटपाची तक्रारनिगडी : प्रभाग क्रमांक १३ डॉ. आंबेडकर वसाहत सेक्टर नं २२ येथे मतदारांना पैशाचे आमिष दाखवत असल्याचे समजताच पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. येथे गर्दी करून थांबलेल्या तरुणांना पोलीस पथकाने पळवून लावले. गर्दी पांगविण्यासाठी काही तरुणांवर पोलिसांनी लाठीचार्जही केला.
मतदानाची शाई पुसण्याचे रसायन जप्त
By admin | Published: February 22, 2017 2:56 AM