काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडमध्ये अस्वस्थता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 01:58 AM2018-07-09T01:58:17+5:302018-07-09T01:58:37+5:30
जुन्या कार्यकर्त्यांवर सतत अन्याय होत असल्याचे कारण देऊन पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी राज्य निरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे आज मुंबईत भेट घेऊन राजीनामा दिला.
पिंपरी - जुन्या कार्यकर्त्यांवर सतत अन्याय होत असल्याचे कारण देऊन पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी राज्य निरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे आज मुंबईत भेट घेऊन राजीनामा दिला. मात्र, पक्षसंघटनेसाठी काम करणार असल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना पिंपरी-चिंचवड काँग्रेसकडे लक्ष न दिल्याने काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी राजीनामा दिल्याने शहराध्यक्षपदी सचिन साठे यांची निवड झाली होती. सन २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भोईरांसह दहा नगरसेवकांनी राष्टÑवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. हा पराभव साठे यांच्या जिव्हारी लागला होता. पक्षबांधणीसाठी प्रयत्न करूनही पक्षाने ताकत न दिल्याने पराभवास सामोरे जावे लागल्याची खंतही साठे यांनी व्यक्त केली होती. तीन वर्षांच्या कालखंडात पिंपरी-चिंचवडकडे पक्षाने लक्ष न दिल्याने साठे यांनी राजीनामा दिला आहे.
साठे म्हणाले, ‘‘गेली २४ वर्षे विद्यार्थिदशेपासून पक्षाच्या विविध पदांवर तन, मन व धन अर्पण करून काम केले आहे. यामध्ये पुणे जिल्हा एनएसयूआय अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व सध्या अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड जिल्हा काँग्रेस कमिटी अशा विविध पदांवर काम करण्याची संधी पक्षाने दिली. मी शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. एक वर्षापूर्वी पक्षांतर्गत निवडणुकीमध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये सर्व सहकाऱ्यांमध्ये पुढील कार्यकाळाकरिता अध्यक्षपदावर पुनश्च निवड केली होती. काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर सातत्याने अन्याय होत आला आहे. यापुढे पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे.’’
विधान परिषदेवर पुन्हा अन्याय
कॉँग्रेसची सत्ता असताना पिंपरी-चिंचवड काँग्रेसकडे नेत्यांनी दुर्लक्ष केले आहे. वरिष्ठ नेत्यांनी लक्ष न दिल्याने पक्षाची ताकत कमी झाली. विधान परिषद निवडणुकीत आजपर्यंत पुण्याला सहा वेळा संधी मिळाली आहे. या वेळी पिंपरीतील काँग्रेसला संधी मिळणार अशी अपेक्षा होती. मात्र, या वेळीही पुण्यातील शरद रणपिसे यांना संधी दिली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. विधान परिषदेवर डावलल्याचा निषेध अनेकांनी केला आहे.