सर्वच जागांवर काँग्रेसचा दावा, निवडणुकांसाठी चाचपणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 12:47 AM2018-11-11T00:47:15+5:302018-11-11T01:02:19+5:30
लोणावळा : कार्यप्रणालीविषयी चर्चा
लोणावळा : पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे जिल्ह्यातील ११ विधानसभा आणि अडीच लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील काँग्रेस
/>पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी, ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी यांचे दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर लोणावळ्यात नुकतेच पार पडले.
लोणावळ्यात पार पडलेल्या या प्रशिक्षण शिबिरात काँग्रेस पक्षाची विचारधारा, पक्षाची कार्यप्रणाली, उद्देश, पक्षाची जनआंदोलन, ६० वर्षांमध्ये काँग्रेसने देशाच्या प्रगतीसाठी दिलेले योगदान, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या कार्यपद्धती आणि विचारधारेतील फरक याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. या शिबिराला पक्षाच्या राज्यच्या सहप्रभारी सोनल पटेल, प्रशिक्षण शिबिराचे मुख्य संयोजक रामहरी रुपनवर, समन्वयक यशवंत हप्पे, मुख्य प्रशिक्षक राजीव साहू, जिल्हाध्यक्ष संजय जगताप, अॅड. सोमनाथ दौंडकर, जिल्हा समनव्यक निखिल कवीश्वर, शहराध्यक्ष विलास बडेकर, माऊली दाभाडे, दत्तात्रय गवळी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
शिबिराच्या समारोप दरम्यान घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सोनल पटेल यांनी सदर प्रशिक्षण शिबिर घेण्यामागचा उद्देश सांगितला. या वेळी जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी कार्यकर्त्यांनी समस्या मांडल्या.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या संभाव्य आघाडीत जिल्ह्यातील काही जागांबाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे ११ विधानसभा आणि अडीच लोकसभेच्या जागा लढविण्याची ताकत काँग्रेस मध्ये असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष जगताप यांनी केले.