पिंपरी : पक्षात माझी मोठ्या प्रमाणावर घुसमट होत आहे, असे म्हणत सचिन साठे यांनी काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षाकडून होणारी माझी उपेक्षा मी सहन करू शकत नाही, असे त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिलेल्या राजीनाम्यात नमूद केले आहे.
सचिन साठे हे २६ वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे काम करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पक्षीय पातळीवर माझी मोठ्या प्रमाणावर घुसमट होत आहे. पक्षाच्या व्यासपीठावर वेळोवेळी अनेक मुद्दे मांडले, त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. शहर पातळीवरील पक्षहितासाठी अनेक विषय उपस्थित केले, त्याचीही दखल घेतली नाही. त्यामुळे काँग्रेसचे काम करण्याची मानसिकता राहिली नाही, त्यामुळे राजीनामा देत आहे, असे राजीनामा पत्रात नमूद आहे.
साठे यांनी एनएसयूआयचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले. प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदावर काम केले. २०१४ ते २०२० या साडेसहा वर्षांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्षपद भूषवले. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसचा निरीक्षक म्हणून काम केले.
दरम्यान, विधानसभेच्या चिंचवड मतदारसंघाच्या पोट निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. अशातच साठे यांनी राजीनामा दिला. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता, बुधवारी आपली सविस्तर भूमिका स्पष्ट करू, साठे यांनी सांगितले.