पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील तीन मतदार संघापैकी एकही मतदार संघ न मिळाल्याने मंगळवारी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. ‘‘शहरातील कॉंग्रेसचे मतदान राष्ट्रवादी काँग्रेसला पाहिजे मग काॅंग्रेसचा उमेदवार का नको ? पवार यांनी समविचारी पक्षांनादेखील बरोबर घेणे व त्यांचा आदर राखणे आवश्यक आहे, असा प्रश्न पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी उपस्थित केला आहे.
काळेवाडीत रविवारी झालेल्या मेळाव्यात शहरातील तीनही जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहिर केले. त्यामुळे शहरातील काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. काँग्रेसने कार्यकर्त्यांच्या भावना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना लेखी पत्राव्दारे कळविल्या आहेत, असेही साठे यांनी सांगितले. निगडी प्राधिकरण येथे काँग्रेसच्या सर्व सेलच्या पदाधिका-यांची बैठक मंगळवारी झाली.
साठे म्हणाले, ‘‘तीन विधानसभा मतदारसंघातील कोणतीही एक जागा काँग्रेसला मिळावी, यासाठी वरिष्ठांकडे मागणी केली आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनीदेखील मागील आठवड्यात पत्रकारांशी संवाद साधताना शहरातील एक जागा कॉंग्रेससाठी घेतली जाईल, असे सांगितले होते. याबाबत कॉंग्रेसचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. परंतू मतदारांच्या व जुन्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून पवार यांनी आत्मचिंतन करावे. महानगरपालिका निवडणुकीत हटवादी भूमिका घेऊन राष्ट्रवादीने निवडणूक लढविली. त्यामुळे काँग्रेसचे नुकसान झाले.’’