पिंपरी : पंचवीस वर्षे सत्ता असताना राष्टÑवादी काँग्रेसने स्वत:ची घरे भरण्याचे काम केले. या कालावधीत हजारो कोटी खर्च करून देखील पुरेशा प्रमाणात शहराचा विकास झाला नाही, अशी टीका पालकमंत्री गिरीष बापट यांनी निगडी येथे केली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांचा शपथ ग्रहण कार्यक्रम बुधवारी सकाळी अकराला निगडीतील भक्ती-शक्ती समुह शिल्पासमोर संपन्न झाला. या वेळी संघटन मंत्री रवि अनासपुरे, भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, राज्यलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, आमदार महेश लांडगे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, भाजपा प्रदेश सचिव उमा खापरे, भाजपा प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, एकनाथ पवार, महेश कुलकर्णी, संघटन सरचिटणीस माऊली थोरात, सारंग कामतेकर, प्रमोद निसळ, अमोल थोरात, बाबू नायर, संजय मंगोडेकर, राजेश पिल्ले, महिला मोर्चा शहराध्यक्षा शैला मोळक, युवा मोर्चा शहराध्यक्ष रवी लांडगे आदी उपस्थित होते. या वेळी संत तुकाराम महाराज देवस्थानचे विश्वस्त हभप संभाजीमहाराज मोरे, हभप किसनमहाराज चौधरी, हाफीजसाहब जैनुद्दीन यांनी उमेदवारांना शपथ दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका करताना बापट म्हणाले, ‘‘पंचवीस वर्षे सत्ता असताना त्यांनी स्वत:ची घरे भरण्याचे काम केले. या कालावधीत हजारो कोटी खर्च करून देखील पुरेशा प्रमाणात शहराचा विकास झाला नाही. त्यांनी गरीब विरुद्ध श्रीमंत अशी दरी वाढविली. भाजपा कौटुंबिक वातावरणात सर्वांना बरोबर घेऊन त्यांच्या दंडेलशाही विरूद्ध पैसा विरूद्ध प्रेम हे धोरण ठेवून निवडणूक लढवित आहे. सत्तेचा गैरवापर करून त्यांनी पैसा, जात, धर्माचा वापर करून शहरातील जनतेत फूट पाडली. आता राष्ट्रवादी काँंग्रेसचे बारामती आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक दोन जिल्ह्यापुरतेच अस्तित्व राहिले आहे.’’
शपथ : भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांचा शपथ ग्रहण कार्यक्रम बुधवारी निगडीतील भक्ती-शक्ती समुह शिल्पासमोर संपन्न झाला. या वेळी रवि अनासपुरे, आमदार लक्ष्मण जगताप, अॅड. सचिन पटवर्धन, आमदार महेश लांडगे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे आदी उपस्थित होते.