पिंपरी : मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत होणे आवश्यक आहे. पुणे मेट्रो पहिल्याच फेजमध्ये निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमच्या वतीने कनेक्टिंग एनजीओच्या अंतर्गत शुक्रवारी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मानवी साखळीचे आयोजन केले होते.पुण्यात व पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे काम सुरू झाले आहे. त्यातून सार्वजनिक वाहतूकव्यवस्था सुसह्य होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराकरिता मेट्रो महत्त्वाची सेवा असणार आहे. परंतु प्रथम फेजमध्ये मेट्रो पिंपरीपर्यंतच येत आहे. निगडी बसस्थानकावरून पुणे शहराकडे जाण्यासाठी बस दीडशे टक्के भरून जातात. तसेच या भागात शैक्षणिक संकुले, शासकीय कार्यालये, कामगार निवासस्थाने, शहरातील पर्यटनस्थळे, वाहतूकनगरी व अन्य महत्त्वाची ठिकाणे आहेत.मेट्रोचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. हा टप्पा निगडीपर्यंत न्यावा, अशी मागणी आहे. त्यामुळे आज मानवी साखळीचे आयोजन केले होते. त्यात शहरातील विविध संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. यामध्ये पोलीस नागरिक मित्र, ज्येष्ठ नागरिक महासंघ पिंपरी-चिंचवड, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाची निसर्गमित्र संघटना, स्टेट बँक आॅफ इंडिया पेंशनर्स असोसिएशन्स पिंपरी-चिंचवड युनिट, सांस्कृतिक संवर्धन व विकास महासंघ, रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी इत्यादी संघटनांनी सहभाग नोंदविला.प्रत्येकाने पुणे मेट्रो निगडीपासून सुरू व्हावी यासाठी हातात फलक घेतले होते. केवळ फलकांच्या माध्यमातून जनजागृती करीत कसलीही निदर्शने न करता अथवा एकही घोषणा न देता शांततेच्या मार्गाने ही मानवी साखळी काढली. पुणे मेट्रो पहिल्या फेजमध्ये निगडीपर्यंत पोहोचली, तरच शहराला पूर्णपणे न्याय मिळणार आहे’, अशा संदेशाचे फलक दाखविण्यात आले....तर निगडीपर्यंत मेट्रो शक्यमेट्रोचा हा साडेअकरा हजार कोटींचा प्रकल्प आहे. यामध्ये केवळ आणखी सहा टक्के रक्कम वाढवली, तर पुणे मेट्रो थेट निगडीपर्यंत जाऊ शकते. निगडी परिसरात सुमारे साडेसहा लाख लोक राहतात. तसेच तळवडे, रावेत, चाकण या भागासाठी निगडीतून पोहोचणे सहजशक्य आहे. निगडीपर्यंत मेट्रो आल्यास इथे ट्रान्सपोर्ट हबदेखील करता येईल. त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या लौकिकात आणखी भर पडेल. पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत पोहोचण्यासाठी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमच्या वतीने मागील एक वर्षापासून स्थानिक आमदार, खासदार व नगरसेवकांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे. मात्र, निवेदन स्वीकारताना सर्वांनी केवळ आश्वासनाव्यतिरिक्त काहीही प्रतिसाद दिलेला नाही, अशी खंत पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमकडून व्यक्त करण्यात येत आहे.
निगडीपर्यंत मेट्रोसाठी मानवी साखळी, लोकप्रतिनिधींना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 3:05 AM