पिंपरी : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या लाॅरेन्स बिष्णोई गॅंगचे पिंपरी-चिंचवड कनेक्शन असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वाकड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपी हा आपण लाॅरेन्स बिष्णोई याच्या मित्राला भेटून आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
वाकड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात फरार असलेला संशयित आरोपी सौरभ ढोरे (वय २४, रा. राजगुरुनगर, खेड) याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. नोव्हेंबर २०२१ मध्ये राम पाटील कृष्णा पाटील, लूह सुतार आणि इतर सात ते आठ जणांनी काळेवाडी फाटा परिसरात दहशत पसरवून प्रतिक किरण पवार या तरुणाला मारहाण केली होती. तेव्हापासून सौरभ ढोरे पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून १६ जून रोजी सौरभ याला पकडले. संतोष जाधव हा आपला मित्र असल्याचे सौरभ याने पोलिसांना सांगितले. तसेच मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित आरोपी संतोष जाधव याच्यासोबत सौरभ जाधव हा मे २०१९ मध्ये राजस्थान येथे गेल्याचे समोर आले. त्यावेळी संतोष याने लाॅरेन्स बिष्णोई याचा मित्र विक्रम बिष्णोई याच्याशी ओळख करून दिली. तसेच संतोष याच्या मदतीने सौरभ याने मध्य प्रदेश येथून गावठी कट्टे देखील मागविल्याचे पोलिसांना सांगितले.
पोलिसांना अलर्ट
लाॅरेन्स बिष्णोई गॅंगशी संपर्कात असलेल्या संतोष जाधव हा ओळखीचा असल्याचे आरोपी सौरभ ढोरे याने सांगितल्याने एकच खळबळ उडाली आहे. सतर्क राहण्याच्या तसेच या प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना देण्यात आल्या आहेत.