निगडी : प्राधिकरण परिसरात दिवसेंदिवस भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. भुरटे चोर पकडण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या भागातील घर, सोसायट्यांमधून भंगार चोरी होणे, वाहनातील बॅटरी अथवा पेट्रोल चोरीला जाणे या घटनाघडत आहेत. या चोऱ्या लहान स्वरूपात असल्याने अनेक वेळा नागरिक पोलिसांत तक्रार करीत नाहीत. त्यामुळेच भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.गॅलरीतून, खिडकीतून कपडे, मोबाईल, खेळणी अशा वस्तू चोरीला जात आहेत. या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. काही ठिकाणी अजून फारशी नागरी वस्ती नाही. अशी ठिकाणे चोरट्यांनी लक्ष्य केली आहेत. रात्रीच्या वेळी प्रेमी युगुलेही हिंडत असतात. काही जण पेट्रोलचोरी करतात. या भागात पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. परंतु, पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.निगडी प्राधिकरणातील काही ठिकणाचे पथदिवे बंद असतात, तसेच अनेक ठिकाणी बांधकामाचा राडारोडा टाकण्यात आला आहे. त्याच्याच फायदा चोरटे घेतात. त्याआड दडून चोऱ्या केल्या जात आहेत. बांधकामाचा राडारोडा रस्त्यावर टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे; परंतु त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आले आहे, अशी नागरिकांची तक्रार आहे.तसेच, निगडी प्राधिकरणातील अंतर्गत भागात गस्त वाढवावी, अशीही मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. (वार्ताहर)
निगडीत वाढल्या चोऱ्या
By admin | Published: February 07, 2017 3:04 AM