ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 18 - तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत देहू आणि आळंदीत स्वच्छतागृह उभारणीसाठी राज्य आणि केंद्राने मुबलक निधी दिला असताना पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पन्नास लाख देण्याचा घाट महापालिकेतील सत्ताधा-यांनी घातला आहे. स्वच्छतागृह बांधणीसाठी देहू आणि आळंदीसाठी प्रत्येक पंचवीस लाखांचा निधी देण्यात येणार आहे. जनतेच्या पैशांवर भाजपाच्या पदाधिका-यांची चमकोगिरी सुरू असल्याची टीका महापालिका वर्तुळात होत आहे.
आषाढीवारीनिमित्त देहू-आळंदी येथून पंढरपूरला पालखी सोहळा जातो. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन संतांच्या पालख्या पिंपरी-चिंचवड शहरातून पंढरीकडे मार्गस्थ होत असतात. त्यामुळे विविध सेवा सुविधा पुरविण्यासंदर्भात नियोजन व्हावे, नागरिकांची गैरसोय टळावी या उदेशाने सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन, देवस्थानांचे प्रतिनिधी अशी बैठक झाली. याविषयीची माहिती देताना महापौर नितीन काळजे यांनी दोन्ही देवस्थांनाना स्वच्छतागृह बांधणीसाठी प्रत्येकी पंचवीस लाख रूपयांचा निधी देणार असल्याचे जाहिर केले. पालखीसोहळा आणि वारकºयांबद्दल असणारी कणव दाखविण्याचा प्रकार सत्ताधा-यांकडून सुरू आहे. महापालिकेच्या पैशांवर पदाधिकाºयांची चमकोगिरी सुरू असल्याची टीका महापालिका वर्तुळात होत आहे.
तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत मोठ्याप्रमाणावर विकास कामांसाठी केंद्र आणि राज्य शासनाने निधी दिलेला आहे. देहूत सुमारे १३ कोटी रूपये खर्चुेन सोहळ्यांसाठी वाढणारी गर्दी लक्षात घेता कायमस्वरूपी स्वच्छतागृह बांधून तयार आहे. असे असताना महापालिका याच उद्देशांसाठी निधी उपलब्ध करून देणार आहे.
याबाबत महापौर काळजे म्हणाले, ‘‘आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या संदर्भात बैठक झाली. यावेळी पदाधिकाºयांनी दोन्ही देवस्थानप्रतिनिधींसाठी आपणास कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे. अशी विचारणा केली. त्यावेळी स्वच्छतागृहांचा प्रश्न मांडला. त्यामुळे महापालिकेने वारकºयांच्या सोयीसाठी स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. देहूकर आणि आळंदीकर सूचवतील त्या ठिकाणी स्वच्छतागृहे निर्माण केली जाणार आहे.’’