पुणे : बांधकामाच्या साईटवर सुरक्षा मानकांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी बांधकाम मजूर सभेच्या वतीने वाकडेवाडी येथील कामगार उपायुक्त यांच्या कार्यालयावर सोमवारी सकाळी निदर्शने करण्यात आली़ पुणे हे आशिया खंडातील सर्वाधिक सदनिका (फ्लॅट) निर्मिती केंद्र आहे. स्वाभाविकच देशभरातून बांधकाम कामगार येथे रोजगारासाठी येतात . परंतु बांधकामाच्या या प्रचंड वेगात व पसार्यात कामाच्या व राहण्याच्या ठिकाणच्या दुरवस्थेला त्यांना सामोरे जावे लागते. कामाच्या व राहण्याच्या ठिकाणची केवळ आबाळ सहन करणे इतक्या पुरतीच ही परिस्थिती सीमित न राहता कामगारांविषयीची ही बेफिकिरी प्राणघातक ठरत आहे. १० दिवसांपूर्वी सिंहगड रस्त्यावरील बांधकाम साईटवरील अपघातात मृत्यूमुखी पडलेले ३ कामगार हे त्याचेच बळी आहेत. म्हातारी मेल्याचेही दु:ख आहे आणि अपघातांचा काळही अधिक सोकावू नये. म्हणून बांधकाम साईटवर सुरक्षा मानकांची अंमलबजावणी करावी, अपघातांना आळा घालावा या मागणीसाठी कामगार उपायुक्त कार्यालयावर ही निदर्शने करण्यात आल्याचे नितीन पवार यांनी सांगितले़
कामगार संघटनांचेही अपयशइमारत नियमन रोजगार कायद्याच्या शर्ती नियम आहेत़ तरीही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने अपघात कमी होण्याऐवजी वाढत चालले आहे़ हे केवळ कामगार उपायुक्त कार्यालयाचे अपयश नसून कामगार संघटनांचेही अपयश असल्याचे नितीन पवार यांनी सांगितले़ बांधकाम मजूर सभेच्या शिष्टमंडळाशी सहायक कामगार आयुक्तांनी चर्चा केली़ हा विषय गंभीर आहे़ अपघात घडल्यानंतर त्याची चौकशी करण्याऐवजी अपघात होऊच नये, यासाठी अपघाताला कारणीभूत असणारी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुन्हा बैठक घेण्याचे यावेळी ठरविण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले़