मयूर जयस्वाल, पिंपरीपिंपरी-चिंचवड शहर देशात उद्योगनगरी म्हणून स्वत:चे अस्तित्व निर्माण करणारे शहर. स्वातंत्र्य काळानंतर जे झपाट्याने औद्योगिकीकरण झाले, त्यामध्ये पिंपरी-चिंचवडने १९५० मध्ये हिंदुस्थान अॅण्टिबायोटिक्ससारख्या कारखान्याने आपला औद्योगिकीकरणाचा पाया रचला व तेथून शहराचा उद्योगनगरी म्हणून प्रवास सुरू झाला. औद्योगिक क्रांती झाल्यावर शहराला अनेक उद्योजकांनी पसंती दिली. त्याचे उदाहरण म्हणजे टाटा मोटर्स (टेल्को), बजाज आॅटो, बजाज टेम्पो (फोर्स मोटार), अॅटलस कोप्को, फोर्ब्स मार्शल, गरवारे ग्रुप, महिंद्रा आणि महिंद्रा, ग्रीव्हज्, एसकेएफ, थायसन क्रुप, अल्फा लावल... अशा अनेक छोट्या-मोठ्या कंपन्यांनी पिंपरी-चिंचवडला उद्योगनगरी म्हणून आशिया खंडात ओळख निर्माण करून दिली. तसेच देशभरातून छोटे-मोठे उद्योजक लघुउद्योजकांच्या माध्यमातून शहरात व्यवसाय करू लागले. अनेक राज्यांतील कुशल व अकुशल कामगारांचा ओढा शहराकडे वाढला व त्यातूनच १९८२ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका अस्तित्वात आली. वाढती लोकसंख्या डोळ्यांसमोर ठेवून विकास आराखडा तयार करण्यात आला.आतापर्यंत ५ हजारांहून छोटे-मोठे कारखाने सुरू झाले. पिंपरी एमआयडीसी, चिंचवड एमआयडीसी, भोसरी एमआयडीसी, अशा शहराचा महत्त्वाच्या ठिकाणी औद्योगिक महामंडळाने उद्योग-वाढीसाठी चालना दिली. व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली सर्व यंत्रणा रस्ते, मुबलक पाणी, लोहमार्ग, वीज उपलब्ध असल्याने उद्योजकांची प्रमुख पसंती बनले व त्यामधूनच पिंपरी-चिंचवड मनपाला जकात व कररूपी उत्पन्नामुळे आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून बहुमान मिळाला. परंतु कालांतराने पिंपरी-चिंचवड हद्दीतील छोटे-मोठे कारखाने सणसवाडी, रांजणगाव, चाकण, तळेगाव, जेजुरी, खंडाळा हिंजवडी एमआयडीसीमध्ये स्थलांतरित होऊ लागले व त्याचा सर्वांत जास्त प्रभाव लघुउद्योजक व कामगारांवर पडू लागला. एवढ्या मोठ्या प्रमाणात मनपाला उत्पन्न मिळताना देखील उद्योगवाढीसाठी व स्थलांतरित होऊ नये म्हणून म्हणावे तसे धोरण मनपाच्या वतीने ठरविण्यात आले नाही. छोट्या व लघु उद्योजकांसाठी मनपाच्या वतीने अल्प दरामध्ये भाडे तत्त्वावर गाळे उपलब्ध करून द्यावेत. असे झाल्यास छोट्या उद्योजकांना त्याचा खूप फायदा मिळेल व त्यांचा जागेचा महत्त्वाचा प्रश्न सुटेल. मनपाच्या वतीने युवा उद्योजक मोफत प्रशिक्षण शिबिराचा कार्यक्रम राबविण्यात यावा. त्याचा उपयोग शहरातील उद्योजकांसाठी, युवा वर्गाला कौशल्याने व्यवसाय करण्यासाठी होईल व सर्वच क्षेत्रांतील उद्योग प्रदर्शन शहरात नेहमी आयोजित करण्यात यावे.अनेक राज्यांतील व इतर देशांतील उद्योजकांना निमंत्रित करून आपल्या शहरामध्ये उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे. १७.२९ लाख लोकसंख्या असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ७० टक्के कामगारवर्ग हा या उद्योग, कारखान्यावर अवलंबून आहे. या सर्वांसाठी मनपाच्या वतीने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, असे झाल्यास उद्योगनगरी ही ओळख कधीही मिटणार नाही.(लेखक युवक काँग्रेस शहराध्यक्ष आहेत.)
उद्योगनगरी म्हणून ओळख कायम राहावी
By admin | Published: October 19, 2015 1:45 AM