पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड, मावळ, परिसरात संततधार पावसाचा जोर गेल्या दोन दिवसांपासून कायम राहिला आहे. पवनाधरणाच्या पाणी पातळीत देखील या पावसामुळे घसघशीत वाढ झाली असून ते ५४. ५१ टक्के भरले आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरात संततधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठले तर काही ठिकाणी झाड पडणे, वाहतुक कोंडी यांसारख्या काही घटना घडल्या. मावळसह पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवनाधरण शनिवारी ( दि. २७ ) सकाळी ६ वाजेपर्यंत धरणसाठ्यात ५४.५१% भरले असुन पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे.धरण परिसरात गेल्या २४ तासात १७९ मिमी पावसाची नोंद झाली असुन तर १ जूनपासुन आजअखेर १३७६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.मावळ पवनानदीवरील बेबडहोळ पुल पाण्याखाली गेला असल्याने सोमाटणे ते पवनानगर वाहतुक बंद करण्यात आली आहे. तसेच परिसरातील शेतक्यांना भात लावणीसाठी मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे. मुुसळधार पावसामुळे निगडी येथे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. पिंपरी चिंचवड शहरात गेली दोन दिवस सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठले तर काही ठिकाणी पावसामुळे झाडे पडल्याच्या घटना घडल्या. शनिवार दि २७ रोजी निगडी कडुन दुर्गानगर चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर यमुनानगर येथे झाड कोसळल्याने येथील वाहतूक सुमारे चार तास बंद होती. त्यामुळे येथे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांचे खूप हाल झाले. महापालिकेच्या फ क्षेत्रीय विभागाच्या उद्यान खात्याचे कर्मचारी, अग्निशामक दल व निगडी वाहतूक पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून नंतर येथील पडलेले झाड दूर करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.येथील स्थानिक नगरसेवक सचिन चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली येथील कार्यकर्त्यांनी झाड लवकर काढण्यासाठी आणि येथील वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले.
.....................
*किवळे रावेत रस्ता झाड पडल्याने बंद. * रावेत गावाजवळ ओढयाला पूर आल्याने देहूरोड-कात्रज बाहयवळण महामार्गाकडे जाणारा रस्ता पाणी आल्याने बंद * किवळेत पवना नदीचे पाणी आंब्याच्या बागेत व स्मशानभूमीत शिरले आहे. * किवळे-मामुर्डी रस्ता ओढयाच्या जोरदार पाण्याने खचला आहे.* सांगवडे येथील साकव पूलापर्यंत पवना नदीचे पाणी आले आहे * गहूंजे -साळुंब्रे दरम्यानच्या साकव पूलावरुन पाणी वाहत असून पूलाकडे जाणाऱ्या रस्ते व शेतात नदीचे पाणी शिरले आहे *धामणे येथील पवना नदीवरील पूल अनेक वर्षांनी पाण्याखाली गेला असून संपर्क तुटला आहे* मुंबई द्रुतगती मार्गाच्या मामुर्डी येथील भूयारी मार्गात मोठया प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे