पिंपरी : केंद्र सरकारच्या अमृत अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड शहरासाठी दोन टप्प्यात पाणीपुरवठा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. दहा महिन्यांपूर्वी या प्रकल्प खर्चाला मान्यता दिली. दोनवेळा निविदा मागवूनही ठेकेदारांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने एका कामाची मोठी निविदा काढण्याऐवजी त्याचे तुकडे करून चार पॅकेजमध्ये निविदा मागविल्या. त्यापैकी तीन पॅकेजसाठी ठेकेदारांच्या जादा दराने आलेल्या निविदा स्वीकारल्या आहेत.तीनही पॅकेजची एकत्रित निविदा रक्कम १६० कोटी रुपये असताना ठेकेदारांना प्रत्यक्षात १६६ कोटी रुपये मोजण्यात येणार आहेत. त्याबाबतचा निर्णय स्थायी समिती सभेत बुधवारी होणार आहे. अमृत अभियानाच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास मान्यता देण्यात आली. प्रकल्पासाठी केंद्रातर्फे प्रकल्प किमतीच्या ३३.३३ टक्के, राज्य सरकारतर्फे १६.६७ टक्के आणि पिंपरी महापालिकेतर्फे ५० टक्के निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. दोन टप्प्यात राबविण्यात येणाºया पाणीपुरवठा प्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यात ११८ कोटी ८४ लाख रुपये तर दुसºया टप्प्यात १२५ कोटी २० लाख रुपये असा एकूण २४४ कोटी ४ लाख रुपयांच्या सुधारित प्रकल्पास मान्यता दिली.या कामाची निविदा पहिल्यांदा २८ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रसिद्ध झाली. २०९ कोटी ९ लाखांच्या कामासाठी लक्ष्मी सिव्हील इंजिनिअरिंग सर्व्हिसेस या एकाच ठेकेदाराने निविदा भरली. त्यानंतर दोन वेळा मुदतवाढ दिली. कोणीच स्पर्धेत भाग घेतला नाही. त्यामुळे ६ एप्रिल २०१७ रोजी निविदा रद्द केली. त्यानंतर याच कामासाठी १५ मे २०१७ रोजी फेरनिविदा काढली. या वेळीही पुन्हा लक्ष्मी सिव्हील इंजिनिअरिंग यांचीच निविदा प्राप्त झाली. १७ टक्के ज्यादा दराने निविदा भरणाºया या ठेकेदाराने वाटाघाटीनंतर सुधारित १६.५९ ज्यादा दराची आॅफर दिली. त्यामुळे आयुक्तांनी ही निविदाही रद्द केली.एकऐवजी चार निविदादोन वेळा निविदा मागवूनही ठेकेदारांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने या कामासाठी एक निविदा मागविण्याऐवजी दोन टप्प्यांसाठी दोन अशा चार निविदा मागविल्या. त्यानुसार, महापालिकेने २१३ कोटी रुपयांच्या चार निविदा मागविल्या. पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत पहिल्या पॅकेजमध्ये पिंपरी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, दापोडी, रावेत, मामुर्डी या गावांसाठी ४९ कोटी २४ लाख ३ हजार रुपये किमतीची निविदा काढली.दुसºया पॅकेजमध्ये वाकड, थेरगाव, पुनावळे, पिंपळे निलख, रहाटणी या गावांसाठी ५९ कोटी ६० लाख ८३ हजार रुपयांची निविदा काढली. तिसºया पॅकेजमध्ये आकुर्डी, चिखली, जाधववाडी, रुपीनगर या गावांसाठी ५२ कोटी ४ लाख ३४ हजार रुपये कामाची निविदा काढली. तर, चौथ्या पॅकेजमध्ये इंद्रायणीनगर, बोपखेल, चºहोली, डुडुळगाव, मोशी, नेहरूनगर, वडमुखवाडी या गावांसाठी ५१ कोटी ७८ लाख ७४ हजार रुपये खर्चाची निविदा काढली.>सहा कोटींचा अतिरिक्त खर्चपहिल्या पॅकेजसाठी तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी अरिहंत कन्स्ट्रक्शनने ३.६० टक्के जादा म्हणजेच ५१ कोटी १ लाखाची निविदा सादर केली. इतर दोन ठेकेदारांपेक्षा त्यांची निविदा लघुत्तम असल्याने ती स्वीकृत केली आहे. दुसºया पॅकेजसाठी चार ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी अरिहंत कन्स्ट्रक्शनने २.७० टक्के जादा म्हणजेच ६१ कोटी २१ लाखांची निविदा सादर केली. इतर तीन ठेकेदारांपेक्षा अरिहंत यांची निविदा लघुत्तम असल्याने ती स्वीकारली आहे.तिसºया पॅकेजसाठी पी. पी. गोगड यांची ४.४० टक्के जादा म्हणजेच ५४ कोटी ३३ लाखांची निविदा घेतली. चौथ्या पॅकेजसाठी मुदतीत निविदा सादर न झाल्याने तीनच ठेकेदारांच्या जादा दराने आलेल्या निविदा स्वीकृत करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ३ नोव्हेंबर २०१७ रोजी मान्यता दिली. तीनही निविदांची मूळ रक्कम १६० कोटी ८९ लाख रुपये इतकी होती. मात्र, जादा दराने या निविदा स्वीकृत केल्याने कामाचा खर्च पावणेसहा कोटींनी वाढला असून, १६६ कोटी ५६ लाखांवर हा खर्च पोहोचला आहे.
‘अमृत’साठी जादा दराने ठेका, पाणी पुरवठ्यासाठी १६० ऐवजी १६६ कोटी रुपये खर्चाची निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 1:48 AM