लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : टाटा मोटर्स कंपनीत काही महिन्यांपूर्वी झालेल्या कराराने सीयूव्ही प्लँटमधील सुमारे पाच हजार कामगारांना वेतनवाढीचा लाभ मिळाला. मात्र, कार प्लँटमधील उर्वरित २३०० कामगार या लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. मध्यंतरी काही कारणास्तव व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यातील समन्वयात काही त्रुटी होत्या. त्यात सुधारणा घडून आली असून कराराची बोलणी सुरू झाली आहे. त्यामुळे कामगार वर्गाला वेतनवाढीविषयी उत्सुकता आणि प्रतीक्षा आहे. टाटा मोटर्स कंपनीतील करार अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता. दरम्यानच्या काळात कंपनीत वरिष्ठ पातळीवरील व्यवस्थापनात अचानक काही बदल घडून आले. त्यामुळे करारासंबंधीचा निर्णय होण्यास आणखी काही दिवस वाट पहावी लागली. मात्र समन्वयाच्या भूमिकेतून त्यावर तोडगा काढण्याच्या हालचाली दिवाळीच्या तोंडावर झाल्या होत्या. व्यवस्थापन व कामगार संघटनेतील वादावर पडदा पडल्याने सीयूव्ही प्लँटमधील कामगारांना वेतनवाढीचा लाभ मिळाला. कार प्लँटमधील कामगारांची रखडली देणीदरम्यानच्या काळात पुन्हा कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काही वादाचे प्रसंग उद्भवले. काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. त्यांच्या जागी नव्याने पदाधिकारी निवडले गेले. या घडामोडीमुळे दुसऱ्या प्लँटमधील कामगारांची वेतनवाढ रखडली होती. आता पुन्हा ज्या कामगारांचा करार झाला नव्हता, त्यांचाही करार करण्यात यावा. यासंबंधी बोलणी संघटना व व्यवस्थापनामध्ये सुरू झाली आहेत.
टाटा मोटर्समध्ये करारासंबंधी हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 5:13 AM