- प्रकाश गायकर
पिंपरी : मागील वर्षी उन्हाळ्यात मोशी येथील कचरा डेपोस अनेकदा आग लागली. त्या प्रकरणी चौकशी समितीने दिलेल्या अहवालावरून संबंधित ठेकेदाराला ३ लाखांचा दंड करण्यात आला आहे. तसेच यापुढे आग लागणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शहरातून जमा केलेला कचरा मोशी कचरा डेपोत डंप केला जातो. कचर्यांच्या ढिगास ६ व १६ एप्रिल २०२२ ला अशी दोन वेळा आग लागली होती. ती आग अनेक तास धुमसत होती. त्यामुळे धुराचे लोट परिसरात उसळले होते. ती आग संबंधित ठेकेदाराने लावल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्या प्रकरणी तत्कालिन आयुक्त राजेश पाटील यांनी मोशी कचरा डेपोची पाहणी केली. संबंधित ठेकेदाराकडून आगीबाबत खुलासा मागविण्यात आला होता.
उन्हाळ्यामुळे तापमान वाढल्याने कचर्याच्या ढिगार्याखाली मिथेल वायुची निर्मिती होते. हवेचा दाब निर्माण झाल्याने ज्वलनशील वायूचे उत्सर्जन होऊन आगीची घटना घडल्याचे अधिकार्यांनी खुलासा देऊन स्पष्ट केले होते. ठेकेदाराचा खुलासा समाधानकारक नसल्याने आयुक्त पाटील यांनी चौकशी समिती नेमली होती. समितीने अहवाल आयुक्त शेखर सिंह यांच्यासमोर ठेवला होता.
अहवालातील शिफारशीनुसार संबंधित ठेकेदाराला ३ लाखांचा दंड करण्यात आला. अग्निशामक दलाच्या बंबांना पाणी मारण्यास जितका खर्च झाला तितका हा दंड आहे. तो दंड वसुल करण्यात आला आहे. कचरा डेपोत पुन्हा आग लागू नये म्हणून दक्षता व खबरदारी घ्यावी असे आदेश देण्यात आले आहे. याबाबत बोलताना पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले, डेपोत अग्निशामक दलाचा बंब ठेवण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. तसेच ठेकेदाराकडून ३ लाख रुपये दंड वसूल केला आहे.