पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक १९ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार काळुराम पवार आणि भाजपाचे शैलेश मोरे यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर दोघांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यात एकजण जखमी झाला आहे. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. दोन्ही उमेदवारांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दोन गटांत चिंचवड येथे वाद झाले. त्यानंतर उमेदवारांचे समर्थक एकमेकांशी भिडले. त्यामध्ये जखमी झालेल्या कार्यकर्त्याला वायसीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर काळुराम पवार याच्यासह बाळू पवार, किरण तेलंगे व अन्य एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार असल्याने गुन्हा दाखल करण्यास शनिवारी रात्री उशीर झाला. त्यानंतर या संवेदनशील प्रभागांत पोलिसांनी रविवारी बंदोबस्त वाढविला होता. (प्रतिनिधी)उमेदवार पुत्रावर पैसे वाटपाचा गुन्हा पिंपरी : चिंचवड येथे मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक १९ मधील उमेदवार गुरुबक्ष पेहलानी यांच्या मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख ३४ हजार रुपये रोकड जप्त करण्यात आली. प्रभाग क़्रमांक १९ मधील मतदारांच्या नावांची यादी, तसेच हस्ताक्षरात लिहिलेले सहा कागद यासह दोन हजारांच्या ६७ नोटा आरोपींकडे आढळून आल्या. जितू गुरुबक्ष पेहलानी, तसेच सुनील शांताराम धोत्रे (वय २५, रा. खराळवाडी) हे दोघे प्रभागातील मतदारांना पैसे वाटप करताना आढळून आले. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंडसंहिता १७१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन उमेदवारांत प्रचारावेळी वादावादी
By admin | Published: February 20, 2017 2:52 AM