वाकड : थेरगावातील प्रसिद्ध डांगे चौकात महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून ग्रेड सेपरेटरचे काम सुरू केले आहे. मात्र हे काम करताना एकाच बाजूने अधिक जमीन संपादित केल्याने व्यवसायावर गदा आल्याचा आरोप करत आज व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. जमलेल्या व्यापाऱ्यांनी महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करत पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली.
ग्रेड सेपरेटर काम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. डांगे चौकात पूर्णपने ४५ मीटर रस्ता रुंदीकरण करावा. तसेच डांगे चौकातील फळवाले, भाजी व्यावसायिक, रिक्षाचालक, टेम्पो चालक व अन्य पथारी व्यावसायिकांना हटवून रस्ता १५० फूट मोकळा करावा. त्यांनतर समप्रमाणात दोनही बाजूला ग्रेड सेपरेटर करावे अशी जोरदार मागणी व्यापाऱ्यांनी केली. वाकड ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महेश स्वामी यांनी व्यापाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलाविण्यात आले आहे.