पिंपरी : कामगारांच्या पगारासाठी आणलेली ६० लाखांची रोकड बनावट चावीने कपाट उघडून चोरून नेली. याप्रकरणी आचाऱ्यासह (कुक) त्याचा भाऊ व वडील यांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. आरोपींकडून ४५ लाख ६९ हजार ५०० रुपयांची रोकड हस्तगत केली. पिंपरी पोलिसांनी ही कामगिरी केली.
अनोदकुमार राजकुमार यादव (वय २८), राजकुमार मुनीश्वर प्रसाद यादव (वय ५४) आणि अंकीत राजकुमार यादव (वय २६), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर मुख्य आरोपी अनोदकुमार याचा आणखी एक भाऊ अनुज राजकुमार यादव (वय २२, सर्व रा. कुमाडान्डा, सदरापूर, बाराबंकी, उत्तर प्रदेश) हा अद्याप फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. अजित संजयकुमार राजहंस (वय ३१, रा. महिंद्रा अँथिया सोसायटी, गांधीनगर झोपडपट्टीसमोर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात २९ एप्रिलला फिर्याद दिली आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनोदकुमार हा फिर्यादीकडे जेवण बनविण्यासाठी ‘कुक’ म्हणून कामाला होता. कामगारांचा पगार देण्यासाठी फिर्यादीने ६० लाख रुपये आणून कपाटात ठेवले होते. आरोपीने २८ एप्रिलला बनावट चावीने कपाट उघडून ६० लाखांची रोकड चोरून नेली. पोलिसांची एक टीम उत्तर प्रदेशात पोचली. आरोपीचा वडील राजकुमार आणि भाऊ अंकित हे दोघेही या गुन्ह्यात सहभागी असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर तांत्रिक महितीच्या आधारे आरोपीला लखनऊनमधून अटक केली. आरोपीकडून ४४ लाख ७० हजारांची रोकड जप्त केली. तर आरोपीचा भाऊ आणि वडिलांकडून ९९ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त केली.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त मंचक इप्पर, सहायक आयुक्त सागर कवडे, यांच्या मार्गदशनाखाली वरिष्ठ निरीक्षक मिलिंद वाघमारे, निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, निरीक्षक भोजराज मिसाळ, सहायक निरीक्षक गणेश लोंढे आणि त्यांच्या शोध पथकाने ही कामगिरी केली.