पिंपरी : महिला बचत गट व विद्यार्थ्यांना कर्ज मिळवून देतो, असे सांगून फसवणूक केली. तसेच प्रधानमंत्री विमा योजनेच्या नावाखाली कोरोनाने जीव गमावलेल्या कुटुंबियांना बनावट फाॅर्म देऊन त्यांच्याकडून प्रत्येकी एक हजार ५० रुपये घेऊन १८२ जणांना गंडा घातला. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतर्फे शहापूर टोलनाका येथे २७ जानेवारीला सापळा रचून एकाला अटक करण्यात आली.
विकास रघुनाथ बांदल (वय ३५, रा. नऱ्हे, आंबेगाव, पुणे), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह विलास वामन पाटील (रा. खराळवाडी, पिंपरी) याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात २४ जानेवारी २०२२ रोजी गुन्हा दाखल केला होता. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विकास बांदल याने तिरुपती कार्पोरेशन अॅण्ड जीवन संजीवन ग्रुप संस्थेची स्थापना करून आकुर्डी येथे मे ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत कर्ज मंजूर करून देण्याचे सांगून काही जणांशी संपर्क साधला. त्यात स्वाभिमानी फायनान्स मार्फत आठ महिला बचत गट यांना कर्ज मंजूर करून देतो, असे सांगून प्रत्येक गटाकडून ४६ हजार ८००, असे एकूण तीन लाख ७४ हजार ४०० रुपये घेतले. तसेच वैयक्तिक कर्ज मंजूर करून देतो, असे २१ जणांना सांगून त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे एक लाख पाच हजार रुपये घेतले. त्या २१ जणांमधील सात जणांकडून कर्ज मंजुरीच्या प्रोसेससाठी एकूण तीन लाख ८६ हजार ९० रुपये, असे एकूण आठ लाख ६५ हजार ४९० रुपये घेतले. त्यानंतर कर्ज मंजूर करून न देता बचत गटातील महिला, विद्यार्थी व स्वाभिमानी फायनान्स यांची फसवणूक केली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आर्थिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू करण्यात आला. त्यात तांत्रिक विश्लेषणाव्दारे आरोपी विकास बांदल याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी २७ जानेवारीला शहापूर टोलनाका येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच चारचाकी वाहन व काही कागदपत्रे देखील जप्त केले.
पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ, सहायक निरीक्षक गणेश पवार, उपनिरीक्षक समीर दाभाडे, मंजुषा शेलार, पोलीसक कर्मचारी प्रमोद लांडे, सुनील गवारी, अमित गायकवाड, सचिन रावते, संतोष चांदणे, भास्कर दिघे, माधुरी उगले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
फसवणुकीसाठी सोशल मीडियाचा वापर
‘प्रधानमंत्री गरीब कल्याण इन्शुरन्स कोविड-१९’ या योजनेची माहिती देऊन त्याचे बनावट फाॅर्म तयार करून आरोपी बांदल याने ते सोशल मीडियावर व्हायरल केले. कोरोनामुळे मयत झालेल्यांच्या कुटुंबियांकडून प्रत्येकी एक हजार ५० रुपये घेतले. अशा पद्धतीने १८२ लोकांची आरोपीने फसवणूक केली.
धुळे येथे थाटले कार्यालय
आरोपी बांदल याने नऱ्हे आंबेगाव, पुणे येथे तिरुपती काॅर्पोरेशन अॅण्ड जीवन संजीवन ग्रुप संस्थेच्या मार्फत पुणे जिल्ह्यातील लोकांची फसवणूक करून कार्यालय बंद केले. त्यानंतर धुळे येथे कार्यालय सुरू करून संस्थेमध्ये काम करण्यासाठी काही जणांना ऑफर लेटर दिल्याच्या तपासामध्ये आढळून आले. आरोपी बांदल याच्या विरोधात यापूर्वी खेड व विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे गुन्हे दाखल असून, तो सराईत गुन्हेगार आहे.