पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून मंगळवारी एकाच दिवसात शहरात पुण्यातील दहा आणि पिंपरी-चिंचवडमधील २४ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर सात जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्ण संख्या ५५९ वर पोहोचली आहे.पुण्याच्या तुलनेत पिंपरी- चिंचवड शहरात कोरोनाचा वेग कमी आहे. हौसिंग सोसायट्या, मध्यमवर्गीय भागासह झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोनाच्या पाचव्या टप्यात शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.गेल्या दोन दिवसांत कोरोनाचा वेग कमी होता तो पुन्हा वाढला आहे. एकाच दिवसात शहरात पुण्यातील दहा आणि पिंपरी-चिंचवडमधील २४ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात पिंपरी-चिंचवडमधील १३ पुरूष आणि ११ महिलांचा तर पुण्यातील सात पुरूष आणि तीन महिलांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रूग्णांमध्ये इंदिरानगर, वाकड, पिंपळेसौदागर, काळेवाडी, भोसरी, दापोडी, पिंपरी, किवळे, सांगवी, अजंठानगर तर पुण्यातील कसबा पेठ, आंबेगाव, दौंड, खडकी, देहूरोड येथील नागरिकांचा समावेश आहे. तर चिंचवड आनंदनगर, भोसरी येथील सात जणांना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर मृत्यू झालेल्यांमध्ये वाल्हेकरवाडी, दापोडी, मंगळवार पेठ पुणे, दौंड येथील नागरिकांचा समावेश आहे. तीन महिन्यात एकाच दिवशी चार जणांचा मृत्यू होण्याची आज पहिलीच वेळ आहे. त्यामुळे मृतांची संख्या २४ वर गेली आहे. महापालिका रूग्णालयात आज साठ जणांना दाखल करण्यात आले असून १५२ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या रूग्णालयात ४१३ जण दाखल केले आहेत. तर १४ जणांना डिस्चार्ज दिला आहे. तर सक्रिय रूग्णांची संख्या २३२ असून आजपर्यंत २८२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.