पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा आलेख वाढत असून गेल्या चोविस तासात एका पुरूषासह चार महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ६४ पैकी साठ रूग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोमवारी दिवसभरात एकही नवीन रूग्ण आढळलेला नाही. शहरात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ३५ वर गेली आहे. सोमवारी पाठविलेले ५९ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. दिवसागणिक संशयित रूग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. एप्रिलच्या पहिल्या दिवसांपासून रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तेरा दिवसात २३ रूग्णांची वाढ झालेली आहे. पिंपरीतील वायसीएम आणि भोसरीतील महापालिकेच्या रूग्णालयात कोरोनाचे रूग्ण उपचार घेत आहेत. पॉझिटिव्ह रूग्णात दिल्लीतील निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिक आणि त्यांच्या सहवासात आलेल्यांचा समावेश अधिक आहे.सोमवारी ५९ जणांना रूग्णालयात दाखल केले आहेत. त्यांच्या घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्हीमध्ये पाठविण्यात आले आहेत. सध्या रूग्णालयात ७८ रूग्ण दाखल असून आज ३८ जणांना घरी सोडून देण्यात आले आहे. तर पिंपरी-चिंचवड शहरातील ६४ जणांच्या घशातील द्रवाचे नमुने रविवारी पुण्यातील एनआयव्हीमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचे अहवाल रविवारी रात्री आले असून त्यात साठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात महिलांचा समावेश आहे. हाय रिस्क कॉन्ट्क्टमधून या महिलांना कोरोनाचा बाधा झाली आहे. सोमवारी दिवसभरात एकही नवीन रूग्ण आढळलेला नाही. शहरात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ३५ वर गेली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ३५ असून त्यातील तीन रूग्ण पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून उर्वरित रूग्ण पिंपरीतील वायसीएम रूग्णालय आणि भोसरीतील महापालिका रूग्णालयात उपचार घेत आहे. मार्च अखेरपर्यत १२ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून २३ रूग्ण उपचार घेत आहेत.