पिंपरी : एका गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पिंपरी - चिंचवड पोलिसांनी या आरोपीला अटक केली होती. त्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यातील तुरुंगात त्याची रवानगी करण्यात आली. तेथे त्याची तपासणी केली असता तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत असलेल्या शहरातील एका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याला पुणे जिल्ह्याबाहेर हलविण्यात आले. दुसऱ्या जिल्ह्यातील तुरुंगात त्याची रवानगी करण्यासाठी शहरातील पोलीस गेले होते. तेथे आरोपीला कोरोनासदृश्य लक्षणे दिसून आली. त्यामुळे तेथील पोलिसांनी त्या आरोपीची कोरोना चाचणी करून घेतली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. संबंधित आरोपी कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आले.
आरोपीला कोरोनाची लागण झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. संबंधित आरोपीच्या संपर्कात आलेले अधिकारी व कर्मचारी अशा २० पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.
पिंपरी-चिंचवड शहरातून दुसऱ्या जिल्ह्यात रवानगी करण्यात आलेल्या या आरोपीला कोरोनाची लागण कशी झाली, कोणत्या शहरात झाली, याबाबत तपास सुरू आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करताना किंवा इतर वेळी खबरदारी घ्यावी, तसेच फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याबाबत सूचना दिल्या आहेत.