पिंपरी : औद्योगिक नगरीतील कोरोनाच्या आकडेवारीने नागरिकांसह प्रशासनाच्या उरात धडकी भरली आहे. सतत वाढणा-या रुग्णांना आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना सुरु आहेत. रुग्णालयांमध्ये बाधितांची संख्या वाढत आहे. बेड कमी पडत आहेत. अनेक ठिकाणी अपुऱ्या सोयी आहेत. अशी परिस्थिती असताना सगळा भार प्रशासनावर टाकून प्रश्न सुटणार आहे का? याचा विचार नागरिकांनी करण्याची गरज निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत आहेत. नियमांचे उल्लंघन करुन फिरत आहे. अशावेळी प्रशासनाकडून किती आणि कोणती अपेक्षा करणार ? हा प्रश्न सध्याच्या परिस्थितीतून समोर आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा बाधितांची रोजची संख्या शंभराहून अधिक आहे. रोज सरासरी 5 पेक्षा जास्त मृत्यु आहेत. वारंवार पालिका आणि जिल्हा प्रशासन नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करुन देखील नागरिक त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत. मागील आठवड्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आता प्रशासनाने पुन्हा लॉकडाऊन करणार नसल्याचे सांगितले. मात्र यात नागरिकांनी स्वत: शिस्त पाळुन सहकार्य दाखविणे गरजेचे आहे.
जुलै महिन्यातील लॉकडाऊन दरम्यान दोन हजारांपेक्षा वाहनचालकांवर करण्यात आलेली कारवाई, तर तीन हजार जणांवर खटले दाखल करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगाल्यानंतर नागरिक पोलिसांवरच आगपाखड करतात. परंतु लॉकडाऊनमध्ये नियम मोडणाऱ्यांची संख्या कमी नाही. कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठांना असूनही ते बिनदिक्कतपणे मॉर्निंग वॉक च्या नावाखाली घराबाहेर पडत आहेत. चहाच्या टप-यांबाहेर तरुणाची गर्दी आहे. छोट्या मोठ्या खाद्यपदार्थांच्या दुकानबाहेर नागरिक इभे आहेत.
नागरिकांचे चुकते काय ? - कुठलेही कारण सांगून घराबाहेर पडणे - खरेदीच्या नावाने गप्पा मारण्यात वेळ घालवणे - ज्येष्ठांनी आरोग्याच्या नावाखाली संसगार्चा धोका वाढवणे - अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीच्या नावाखाली दुकानाबाहेर गर्दी करणे - भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची झालेली झुंबड