पिंपरी : कोराना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला असून, बुधवारपर्यंत (दि. २३) पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील ४५३ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. तर आळंदी पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याचा सोमवारी (दि. २१ ) मृत्यू झाला. शहर पोलीस दलातील कोरोनाचा हा दुसरा बळी ठरला.
अंबरनाथ रामजी कोकणे (वय ५६, रा. पोलीस कॉलनी, मोशी), असे सोमवारी मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. 15 मे रोजी शहर पोलिसात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर सर्वच पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा आणि विविध पथकांमधील पोलिसांना कोरोनाने गाठले आहे. शहरातील तब्बल 16 टक्के पोलिसांना कोरोना झाला आहे. त्यातच कोरोनामुळे शहर पोलीस दलातील दुसरा मृत्यू झाला.
काही पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांना दोनदा कोरोनाची लागण झाली आहे. अनेक गुन्ह्यांचा तपास करताना विविध शहरांमध्ये गुन्हेगारांच्या शोधात फिरताना, तपासासाठी गुन्हेगारांना घेऊन फिरताना देखील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे.
वाहन चोरीच्या गुन्ह्यातील एका आरोपीच्या संपर्कात आलेल्या गुन्हे शाखेच्या एका संपूर्ण टीमला कोरोनाची लागण झाली आहे. आधीच मनुष्यबळ कमी त्यात कोरोनाचा खोडा आल्याने पोलीस दलात चिंतेचे वातावरण आहे. या चिंतेतूनही पिंपरी चिंचवड पोलीस शहराच्या सुरक्षेसाठी निष्ठेने उभे राहत आहेत. ४५३ पैकी ४०४ पोलिसांनी कोरोनावर यशस्वी मात केली. ४७ पोलिसांवर सध्या उपचार सुरू असून दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.