युगंधर ताजणे
पिंपरी: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असणाऱ्या पिंपरी चिंचवड येथील हजारो कामगारांपुढे दोन वेळच्या भाकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाच्या भीतीने तब्बल एक ते दीड लाख कामगारांनी स्थलांतर केले आहे तर उर्वरित कामगारांना हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. कोरोनाचा दिवसेंदिवस वाढत जाणारा संसर्ग यामुळे राज्य सरकारने सुरुवातीच्या काळात उद्योग धंद्यावर अनेक निर्बध घातले होते.
लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात मात्र उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र या दरम्यानच्या काळात औद्योगिक शहरातील कामगारांपुढे 'मजुरीचे' संकट उभे राहिले आहे. हाताला काम नाही, रोजगार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तीन हजार एकर क्षेत्रात असलेल्या एमआयडीसीमध्ये 22 ब्लॉक मध्ये छोट्या मोठ्या स्वरूपाच्या चार ते पाच हजार कंपन्या आहेत. यात काम करणाऱ्या कामगारांची संख्या अडीच लाखापेक्षा अधिक आहे. यातील किमान एक लाख कामगार कोरोनामुळे आपल्या गावी परतले आहेत. महिला कामगारांची संख्या 50 ते 60 हजाराच्या घरात आहे. परंतु सध्या कंपन्या बंद असल्याने रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे. रोजगाराची अनुउपलब्धता, उद्योग बंद आणि मोठमोठ्या कंपन्याच्या धोरणाचा फटका कामगारांना बसला आहे. मोठ्या कंपन्याकडून स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला 'ऑर्डर' मिळणे बंद झाल्याने अडचण वाढली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या इंडस्ट्रीज वेगळा पर्याय शोधताना दिसत आहेत. पिंपरी चिंचवड याठिकाणी ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधित कंपन्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या या कंपन्यामध्ये पेंडिंग कामे सुरू असल्याने त्यांच्याकडून इतर कंपन्यांना स्पेअर पार्टच्या मिळणाऱ्या ऑर्डर कमी झाल्या आहेत. यामुळे कंपन्यामध्ये काम नाही.
..................
एमआयडीसीमध्ये ज्या कंपन्यामध्ये यापूर्वी 100 ते 200 कामगार काम करत होते ते काम केवळ 30 ते 60 कामगारांमध्ये केले जात आहे. गावी न गेलेल्या कामगारांना काम मिळणे अवघड झाले आहे.
काही ठिकाणी मोठ्या संख्येने कामगारांचा प्रश्न निर्माण झाला आहे. बालाजीनगर, फुलेनगर, लांडेवाडी, यशवंतनगर, या झोपडपट्टी भागात राहणारे लोक एमआयडीसीत कामाला आहेत. परंतु आता याभागातील कामगार बेकार झाले आहेत.
…..............
50 टक्क्यांहून अधिक कामागार पुण्यावरून ये जा करणारे आहेत ते येणे बंद झाले आहे. काही ठिकाणी परिस्थिती पूर्ववत होत आहे. मात्र त्यासाठी बराचसा वेळ लागणार आहे.
........
वाहनविक्री बंद, त्यावर आधारित उद्योग बंद, कामाचा तुटवडा, मोठया कंपन्यांच्या धोरणांचा कामगारांना फटका बसत आहे. 'यापुढील याकाळात आमच्याकडून किती प्रमाणात ऑर्डर मिळेल याबद्दल सांगू शकत नाही तेव्हा आपआपल्या जबाबदारीवर प्रॉडक्शन करा.' असे सांगण्यात आले आहे. नवीन उद्योजक यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत. पिंपरीतील अनेक कंपन्या या गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली याठिकाणी गेल्या आहेत. ज्यापूर्वी पिंपरी एमआयडीसी मध्ये होत्या. त्याच्यावर आधारित कामगार बेकार झाला आहे. अनेक कंपन्याची जागा ही मॉल, आयटी सेंटर आणि बाहेरच्या मल्टिनॅशनल कंपन्यानी घेतली आहे. त्याठिकाणी सुरू असलेले उद्योग बंद पडले आहेत. कामगार वर्ग हवालदिल झाला आहे. - अभय भोर, अध्यक्ष फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन, पिंपरी चिंचवड