पिंपरी : राज्यभरात पोलिसांना देखील कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण मोठे आहे. असे असतानाही पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत एकाही पोलिसाला गुरुवारपर्यंत कोरोनाची लागण झाली नव्हती. मात्र शुक्रवारी (दि. १५) शहर पोलिसांतील एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची लागण झालेला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पहिला पोलीस आहे. त्यामुळे शहर पोलीस दलाची चिंता वाढली आहे.
देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. त्यामुळे सदरचा परिसर देहूरोड पोलिसांनी सील केला होता. यात विकासनगर, किवळे येथील काही भाग देखील सील केला आहे. या भागात संबंधित पोलीस कर्मचारी वास्तव्यास असून त्या भागातील नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यात या पोलीस कर्मचाऱ्याला व त्याच्या कुटुंबाला देखील क्वारंटाईन करण्यात आले होते. दरम्यान, खबरदारी म्हणून शहर पोलीस दलातील पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. यात संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी घेण्यात आली. मात्र क्वारंटाईन केले असल्याने या कर्मचाऱ्याला घरीच थांबावे लागत होते. संबंधित पोलीस कर्मचारी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या निगडी येथील पोलीस मुख्यालयात टपाल कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. मला काही झाले नाही, मला कामावर रुजू करून घ्या, अशी विनंती या कर्मचाऱ्याने वरिष्ठांना केली.संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला कामावर रुजू करून घेण्यात आले. त्यामुळे संबंधित कर्मचारी शुक्रवारी (दि. १५) सकाळी टपाल घेऊन चिंचवड येथे पोलीस आयुक्तालयात आला. आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाच्या बाहेर टेबलवर टपाल जमा केले. मात्र त्याचवेळी त्या कर्मचाऱ्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल आला. तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे त्यात नमूद केले आहे. त्यामुळे सदरच्या कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्याकडून टपाल घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला देखील तपासणी करण्यासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. तसेच नियंत्रण कक्षात व आयुक्तालयात निजंर्तुकीकरण करण्यात आले.