तळेगाव दाभाडे : लग्न सोहळ्याहून परतलेल्या तळेगाव स्टेशन येथील एकाच कुटुंबातील चारजणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांचा बुधवारी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांनी दिली.तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत आजपर्यंत एकूण १३ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची नोंद झाली असून त्यातील दोघांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली. सद्या तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत ११ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत . त्यामुळे तळेगाव शहर परिसरात चिंतेचे वातावरण आहे. आज आढळलेले कोरोना पॉझिटिव्ह कुटुंब हे मंगळवारी(दि.२जून) रोजी धुळे येथे एका विवाह सोहळ्याकरिता गेले होते. ते तळेगाव स्टेशन येथील निवासस्थानी गुरुवारी( दि.४जून) परत आले. हे कुटुंब ज्यांच्यासमवेत धुळे येथे लग्न सोहळ्यास गेले होते त्या कुटुंबाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तळेगाव स्टेशन येथील कुटुंबाला त्रास होऊ लागला. त्यांची सोमवारी(दि.१६) तपासणी केली. त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.यामध्ये कुटुंबातील पती (वय३४),पत्नी(वय ३२),मुलगा (वय ११)आणि तीन वर्षीय बालिकेचा समावेश आहे. त्यांच्यावर येथील पणन मंडळाच्या राष्ट्रीय सुगी पश्चात प्रशिक्षण केंद्रातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीत पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये तळेगाव स्टेशन भागातील आनंद नगर येथील एकाच कुटुंबातील चौघांचा तर गाव भागातील राव कॉलनी येथील एका कुटुंबातील तिघांचा समावेश आहे.तळेगाव स्टेशन येथील विद्या विहार कॉलनीतील एकाच कुटुंबातील चार व्यक्तींचा समावेश आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बाधित कुटुंब राहत असलेल्या कॉलनीतील सोसायटीचा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. तर प्रभाग क्रमांक तीनचा काही भाग 'बफर झोन' म्हणून जाहीर करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली. कोरोनाबाधित कुटुंबाच्या हाय रिस्क आणि लो रिस्क संपकातील व्यक्तींचा शोध सुरू आहे,अशी माहिती डॉ. कानडे यांनी दिली.