पुणे :कोरोना विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी सर्वत्र प्रयत्न होत आहेत. विविध शहरे यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवताना दिसत आहेत. असाच एक पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या गावच्या नगरपरिषदेने गर्दी होऊ नये आणि नागरिकांमध्ये सुरक्षित अंतर राहावे यासाठी नवीन संकल्पना राबवली आहे. त्यांच्या या कल्पनेला सोशल मीडियावर दाद मिळताना दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती भारतीयांना 'सोशल डिस्टन्स' अर्थात सुयोग्य अंतर राखण्यास सांगत आहे. कोरोनाचे विषाणू एकमेकांकडे जाऊन हा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी हा उपाय सांगण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर मंगळवारी रात्री देशाला संबोधून मोदी यांनी २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे आता देशातील अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व व्यवहार बंद आहेत. आपापल्या भागातील कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणाही आता जोरदार कामाला लागल्या आहेत.
हेच उदाहरण तळेगाव दाभाडे इथेही बघायला मिळाले असून तिथे १६ भाजी आणि फळांच्या दुकानांसमोर प्रत्येकी पाच चौकोन करण्यात आले आहेत. त्यात चौकोनात प्रत्येकी एक प्रमाणे दुकानाबाहेर केवळ पाच नागरिकांना उभे राहण्यास परवानगी आहे. या चौकोनांमध्ये अंतर ठेवण्यात आले आहे. तळेगाव स्टेशनबाहेर दहा तर गावात सहा अशा एकूण १६ अत्यावश्यक दुकानाबाहेर ही उपाययोजना करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षित अंतर राखले जाणार असून अनावश्यक गर्दीही टाळली जाणार आहे.