नारायण बडगुजर
पिंपरी : राज्यात प्रचंड प्रमाणात मागणी असल्याने आॅक्सिजनचा तुटवडा आहे. त्याचा फटका पिंपरीतील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील जम्बो कोविड सेंटरला बसला आहे. आॅक्सिजनचा पुरवठा न झाल्याने हे सेंटर प्रत्यक्षात कार्यान्वित होण्याचा शुक्रवार पाठोपाठ शनिवारचाही मुहूर्त टळला आहे. दोन दिवसांत रुग्ण दाखल करून घेण्यास सुरुवात होईल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, आॅक्सिजनअभावी हे सेंटर सध्या ‘व्हेंटिलेटर’वर असून शहरातील रुग्णांना त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्या ४७ हजारांवर पोहचली आहे. त्यामुळे महापालिका रुग्णालयांवर ताण आला आहे. तसेच काही खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट होण्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे राज्य शासन, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या वतीने अण्णा साहेब मगर स्टेडीयम येथे ८१६ खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्याचे आॅनलाइन लोकार्पण झाले. त्यानंतर शुक्रवारी हे सेंटर कार्यान्वित करण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र काम पूर्ण न झाल्याने शनिवारी रुग्ण दाखल करण्यास सुरुवात होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र तोही मुहूर्त टळला. एक दोन दिवसांत हे सेंटर कार्यान्वित होईल, असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
कोविड सेंटरमध्ये आॅक्सिजनची सुविधा असलेले बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यासाठी आॅक्सिजनची टेस्टिंग घेण्यात येत आहे. त्याचे शेवटच्या टप्प्यातील किरकोळ स्वरुपाचे काम सुरू आहे. तसेच येथे योगा सेंटर देखील राहणार आहे. दररोज योगाची प्रात्याक्षिके सादर करण्यात येऊन रुग्णांना योगासनांबाबत मार्गदर्शन केले जाईल. त्याचेही काम शेवटच्या टप्प्यात आहे.
अग्निशामक दल, पोलिसांसाठी कक्षकोविड सेंटरमध्ये आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित आहे. त्यात अग्निशामक यंत्रणाही आहे. अग्निशामक दलासाठी येथे स्वतंत्र कक्ष उभारण्यात येत आहे. त्यामुळे अग्निशाम दलाचे पथक २४ तास येथे सतर्क राहणार आहे. तसेच पोलीस मदत कक्ष देखील उभारला आहे. त्यामुळे कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णाची नोंद आदीसाठी येथे पोलीस कार्यरत राहणार आहेत.
............
पीएमआरडीएकडून प्रकल्प हस्तांतरीत करून घेतला जात आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. काही बाबींची पुर्तता राहिली आहे. एक-दोन दिवसात कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण दाखल करून घेण्यास सुरूवात होईल.- डॉ. पवन साळवे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महपालिका
..........
कोविड केअर सेंटर सुरू झाल्यानंतरही बाहेरची काही कामे आठवडाभर आवश्यकतेनुसार सुरूच असतात. तशा स्वरुपाची काही किरकोळ स्वरुपाची कामे होत आहेत. मात्र आॅक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे महापालिकेकडे अद्याप सेंटर हस्तांतरीत केलेले नाही. आॅक्सिजन उपलब्ध झाल्यानंतर हस्तांतर होईल. त्याबाबत महापालिका अधिकाºयांसोबत बैठकीत चर्चा झाली आहे.- सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमआरडीए
............
कोविड केअर सेंटरमध्ये आॅक्सिजनची सुविधा असलेले बेड उपलब्ध आहेत. अशा बेडपर्यंत आॅक्सिजनचा सुरळीत पुरवठा होतो आहे किंवा नाही, याची टेस्टिंग करणे आवश्यक आहे. ते टेस्टिंग झाल्यानंतर रुग्ण दाखल करण्यास सुरूवात होईल. एक- दोन दिवसांत हे सेंटर प्रत्यक्षात कार्यान्वित होईल.- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका