पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘माझे कुंटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम शहरभर राबविणेत येत आहे. या मोहिमेसाठी १३४९ सर्व्हेक्षण पथके शहरात कार्यरत असुन त्यांचेमार्फत आजअखेर एकुण ३ लाख एकोण पन्नास हजार कुटुंबातील १० लाख ४५ हजार नागरिकांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व कोविड मुक्त महाराष्ट्र मोहिमे अंतर्गत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविण्याची सुचना राज्य शासनाने दिली असून त्या अंतर्गत गृहभेटी देवून नागरिकांना आरोग्य शिक्षण व त्यांची आरोग्य तपासणी सुरू आहे. कोरोना महामारीची साखळी तोडण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात "माझे कुटुंब माझी जबाबदारी" ही मोहीम महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असुन या मोहिमेसाठी नागरिकांनी स्वतः हुन पुढाकार घेत या मोहीमेला आजपर्यंत उस्फुर्त असा प्रतिसाद दिला आहे.
पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, 'नागरिकही मनात कोणताही संकोच न ठेवता आपल्या बरोबरच आपल्या कुटुंबांची तपासणी करून घेत आहेत. तसेच प्रत्यक्ष गृहभेट देणाऱ्या महापालिकेच्या टीम ला सहकार्य देखील करत असुन ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात मदत होत आहे. शहराची एकुण लोकसंख्या २४ लाख ४ हजाराच्या जवळपास असुन या लोकसंख्येच्या ४३ टक्के म्हणजेच १० लाख ४५ हजार नागरिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. यामध्ये ३५ हजार त्र्याऐंशी नागरीक कोमॉर्बिड आढळून आले आहेत. तरी पुढील १० दिवसात उर्वरीत नागरिकांची तपासणी करण्यात येणार असल्याने नागरिकांनी गृहभेटी देणाऱ्या महापालिकेच्या पथकास सहकार्य करावे.''आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ''माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोगयाची माहिती मिळणार आहे. किती नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला ही माहिती मिळणार आहे.''