पिंपरी : कोरोना रुग्णांची पिंपरी-चिंचवड शहरातील संख्या कमी होत असतानाच इंग्लंडहून परतलेल्या शहरातील प्रवाशांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे प्रशासनासह शहरवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. या प्रवाशांपैकी बुधवारी सहा जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला.
इंग्लंड येथून पिंपरी-चिंचवड शहरात परतलेल्या २६७ प्रवाशांचा आतापर्यंत शोध घेण्यात आला आहे. त्यातील १८८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील १५६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, २६ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. शहरात बुधवारी १६७ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९६४८३ झाली. तर दिवसभरात १९८ जण कोरोनामुक्त झाले. २१३३ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात १६८७ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले.शहरात बुधवारी दिवसभरात नऊ रुग्ण दगावले. यात महापालिका हद्दीतील दोन तर शहराबाहेरील सात रुग्णांचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १७५४ तर महापालिका हद्दीबाहेरील ७२९ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. बुधवारी दिवसभरात १३८९ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून २१५७ जणांना घरी सोडण्यात आले. तर ६४० रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ६९ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. महापालिका हद्दीबाहेरील ७३८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ९३३०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह ४० रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. शहरात बुधवारी मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये चिंचवड येथील ७४ वर्षीय पुरुष, सांगवी येथील ५५ वर्षीय महिला, तसेच चाकण, जुन्नर, अमरावती, देहूरोड, विश्रांतवाडी, आळंदी येथील रुग्णांचा समावेश आहे.