तेजस टवलारकर-
पिंपरी : ध्यानीमनी नसताना मार्चमध्ये कोरोनाचे संकट आले. सात महिन्यांपासून जिवावर उदार होऊन संकटाशी दोन हात केले. रुग्णसंख्या दोन आकड्यांपर्यंत कमी झाली. मात्र, लागोपाठ आलेल्या सण-उत्सवांमध्ये नागरिकांनी वारेमाप गर्दी केली आणि आता रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तरीही न डगमगता या युद्धात लढण्यासाठी आम्ही तयार आहोत, असा विश्वास व्यक्त करून सेवा हाच परमो धर्म: असल्याचे परिचारिकांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. सुरुवातीला कोरोना वॉर्डमध्ये काम करायचे याची सर्वांनाच भीती होती. आपल्यामुळे मुलांना, घरच्यांना संसर्ग होऊ नये, म्हणून काळजी घ्यावी लागत होती. पण, रुग्णांचा जीव वाचवण्याला प्राधान्य दिले. डॉक्टरांबरोबरच परिचारिकांनी जिवाची बाजी लावून काम केले. वायसीएममध्ये कोरोनाच्या काळात ३५० परिचारिका काम करत होत्या. त्यातील ६० परिचारिकांना कोरोनाची लागण झाली होती. यात एका परिचारिकेचा मृत्यू झाला. सुरुवातीला भीती आणि उपचारपद्धती हे सगळंच नवीन होतं. आता सात महिन्यांचा आम्हाला अनुभव आहे. त्यामुळे कसे काम करायचे, काळजी कशी घ्यायची हे आम्हाला कळलं आहे, असे परिचारिका सांगत होत्या.
----
रुग्णसंख्या कमी झाल्याचा आनंद होता. आपण ही लढाई जिंकली अशी भावना होती. परंतु, दिवाळीनंतर रुग्ण वाढत आहेत. पुन्हा पूर्वीसारखी परिस्थिती आल्यास सर्व परिचारिका काम करण्यास सज्ज आहेत. रुग्णसेवा हेच आमचे पहिले कर्तव्य आहे.
- मोनिका चव्हाण, मेट्रन, वायसीएम रुग्णालय
---
कोरोनाची भीती असली तरी सर्व परिचारिका आपले काम नियमित करीत आहेत. या काळात परिचारिकांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यामुळे घरच्यांना लागण झाली. याही परिस्थितीत परिचारिकांनी काम केले.
- रेखा थिटे, अतिरिक्त सचिव, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन