नारायण बडगुजर- पिंपरी : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या परिसरात १० दिवस तपासणी केली जाते. संबंधित रुग्णांच्या हायरिस्क व लो रिस्क कॉन्टॅक्टमधील नागरिकांचा शोध (ट्रेसिंग) घेऊन तपासणी केली जाते, असा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जातो. प्रत्यक्षात मात्र प्रशासनाकडे अपुरी यंत्रणा असल्याने त्यांना शक्य तेवढेच ट्रेसिंग व टेस्टिंग, तसेच सर्वेक्षण होत असल्याचे ‘लोकमत’ पाहणीत समोर आले. प्रशासनाकडून ट्रेसिंग होत नसल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत दररोज हजारावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. या पॉझिटिव्ह रुग्णांच्या हायरिस्क व लोरिस्क कॉन्टॅक्टमधील नागरिकांचा शोध घेऊन अर्थात ‘ट्रेसिंग’ करून तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच संबंधित रुग्णांच्या परिसरात सर्र्वेक्षण आवश्यक आहे. मात्र ट्रेसिंग, टेस्टिंग व सर्वेक्षण प्रत्यक्षात होत नसून त्याचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते.
कोरोना महामारीच्या पहिल्या टप्प्यात रुग्ण आढळलेला परिसर कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषीत केला जात. मात्र लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर रुग्ण आढळलेली इमारत कन्टेन्मेंट करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे संबंधित परिसर प्रतिबंधित न करता केवळ इमारत कन्टेन्मेंट करण्यात येत होती. मात्र अशा इमारत अथवा घरात कोणीही सहज ये-जा करू शकत असल्याने संशयित रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले. यातून कोेरोनाचा संसर्ग वाढल्याचे चित्र आहे. तसेच सध्या आठ किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण आढळलेला परिसर कन्टेन्मेंट झोन घोषित करण्याचे धोरण आहे. तरीही प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना दिसत नाही.
वाढत्या पॉझिटिव्ह रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जास्तीत जास्त तपासणी व निदान आवश्यक आहे. तसेच रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधणे, त्यांच्या चाचण्या व विलगीकरण ही प्रक्रिया वेळेत व्हायला पाहिजे. त्यासाठी महापालिकेकडून स्वतंत्र पथक नियुक्त केले आहेत. मात्र ही पथके पूर्ण क्षमतेने कार्यरत नाहीत. तसेच त्यांच्यावर प्रशासनाचे पूर्ण नियंत्रण असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे केवळ कागदोपत्री ट्रेसिंग व सर्वेक्षण केले जात आहे. यातून चुकीची आकडेवारी उपलब्ध होत असून, योग्य माहिती समोर येत नाही. परिणामी कोरोनावरील उपाययोजना व त्यांची अंमलबजावणी कुचकामी ठरत आहे.
पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्यामुळे देखील कामाचा बोजवारा उडत आहे. शिक्षक, पीएमपीएमएल कर्मचारी आदींना सर्व्हेक्षणाची जबाबदारी दिली आहे. मात्र आवश्यक सुरक्षासाधने उपलब्ध होत नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे सर्व्हेक्षण करताना अडचणी येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कामाचा ताण कमी करण्यासाठी सामाजिक, स्वयंसेवी संस्था, विविध संघटना तसेच राजकीय कार्यकर्ते यांची मदत घेता येणे शक्य आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन प्रयत्न केले पाहिजेत.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत असल्यामुळेच दररोज सरासरी चार हजार चाचण्या होत आहेत. त्यामुळे निदान होऊन हजारावर रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेली इमारत प्रतिबंधित न करता मोठे कन्टेन्मेंट झोन केले जात आहेत.- संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका, पिंपरी-चिंचवड